गरजेपेक्षा अधिक मोफत धान्य मिळत असल्याने त्याची बाजारात होते विक्री – संरक्षण मंत्री राजनाथसिंह

करकट (बिहार) – मोफत रेशन योजनेंतर्गत लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य मिळत असल्याने लोक अतिरिक्त धान्य बाजारात विकत आहेत असा दावा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज येथील जाहीर सभेत बोलताना केला. यावेळी त्यांनी जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातील अन्नधान्य स्वस्तच असल्याचाही दावा केला असून विरोधी पक्षांचे लोक महागाईच्या मुद्द्यावरून खोटी ओरड करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारच्या करकट लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, देशातील अन्नधान्यांचे सध्याचे दर जगातील सर्वात कमी आहेत. तरीही देशात महागाईवरून ओरड होते असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी उपस्थितांना विचारले की, तुम्हाला प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत मिळत नाही का? मला माहित आहे की एका कुटुंबात चार सदस्य असले तरी प्रत्येकाला ५ किलोचा पुरवठा होत आहे आणि ज्यांना ते वापरता येत नाही त्यामुळे जास्तीचे धान्य ते विकून टाकत आहेत असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने शौचालये, पक्की घरे यासारख्या कल्याणकारी उपाययोजना करून लोकांवर उपकार केले नसल्याचा दावा करून ते म्हणाले की, भाजपचे लोक सेवेच्या भावनेने राजकारण करत आहेत.
महागाईच्या नावाने सध्या खूप हुल्लडबाजी सुरू आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशातील अन्नधान्य महागाई दर जगातील सर्वात कमी २.९१ टक्के आहे. अमेरिकेत हे प्रमाण ७.७९ टक्के, फ्रान्समध्ये १९ टक्के, ऑस्ट्रेलियामध्ये ८.५ टक्के, पाकिस्तानमध्ये ४८ टक्के आणि श्रीलंकेत २१ टक्के आहे.
आपल्या सुमारे ३० मिनिटांच्या भाषणात, राजनाथसिंह यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आणि दावा केला की कॉंग्रेस लवकरच डायनासोरसारखी नामशेष होईल. आरजेडीच्या कंदीलातील तेल आता संपले आहे असा दावाही त्यांनी केला. पाकिस्तान सध्या भारतात दहशतवादी पाठवण्याची हिंमत करत नाही. रशिया आणि युक्रेनने तेथे अडकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी त्यांचे युद्ध थांबवले होते हे मान्य केले आहे, असा दावाही त्यांनी केला.




