“अदानी पोर्टवरील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठीच आर्यन खान प्रकरण”

मुंबई : क्रुजवरील कारवाई प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहे. तर आज आर्यनची कारागृहातून सुटका झाली आहे. महिनाभरापासून याच प्रकरणाकडे माध्यमांचं लक्ष लागलं आहे. मात्र हे प्रकरण गुजरात येथील अदानी पोर्टवर सापडलेलं ड्रग्ज प्रकरण लपविण्यासाठीच घडवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी करत आहे, असा आरोप भुजबळ यांनी केलाय. तसेच या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळालाय, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे, असं म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.
गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असं करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणलं जात असल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं.
दरम्यान भाजपकडून महाराष्ट्रात राष्ट्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे.भाजप लोकांना त्रास देत आहे. मात्र नवाब मलिक यांनी हे सगळ सिद्ध केल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं.





