आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचे NCB वर गंभीर आरोप; म्हणाले…

नवी दिल्ली – मागील महिनाभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. त्यातच आर्यनला या प्रकरणी महिनाभर कारागृहात राहावं लागलं. सतत जामीन नाकारल्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम वाढला. अखेरीस अभिनेता शाहरुख खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच केस माजी अटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्याकडे सोपवली. त्यांनीही आर्यनला जामीन मिळवून दिला. मात्र आता रोहतगी यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत.
आर्यनविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसताना एनसीबीने केस फार खेचल्याचा आरोप त्यांनी केला. ते एका मुलाखतीत बोलत होते. तपास यंत्रणा लोकांना अटक झाल्यानंतर तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न करतात. कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांना संवेदनशील करणे तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान आर्यनकडे ड्रग सापडलं नाही. तो अरबाझ मर्चंटसोबत तिथे होता. तसेच त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचे, सोबत बाळगल्याचे किंवा विक्री-खरेदी केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. तरी NCB ने हे प्रकरण व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते लांबल्याचा आरोप रोहतगी यांनी केला.





