Arvind Sawant | दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर एका वक्तव्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
‘येथे इंपोर्टेड माल चालत नाही. आमच्याकडे इंपोर्टेड माल चालत नाही, ओरिजनल माल चालतो’, असं विधान अरविंद सावंत यांनी केलं होतं. या विधानानंतर शायना एनसी यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर वाद होण्यास सुरुवात झाल्यावर अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शायना एनसी या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आहेत.
अरविंद सावंत काय म्हणाले?
“आमच्याकडून महिलांचा अपमान कधीच होणार नाही. मी कधीही महिलेचा अपमान केला नाही करणार नाही. माझ्या एका वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं अरविंद सावंत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मी काम करतो. माझ्यावर ज्या प्रकारे अनेक जणांनी हल्ले केले त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी असे सावंत म्हणाले. “आमच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा आशिष शेलारांनी जो उल्लेख केला. त्यासाठी त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला का? वामन म्हात्रे पत्रकार बहिणीबद्दल बोलले, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला?. संजय राठोड तुमच्यासमोर आहे, त्याच्याबाबत काय केलं? गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला?” असे प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारले.
शायना एनसी
“एक सक्षम महिला 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. यावरून तुमची मानसिक स्थिती लक्षात येते. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते 20 तारखेला पाहा,” असं शायना एनसी म्हणाल्या.