अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ

Arvind Kejriwal | दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनीलॉंडरिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनाची मुदत आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात यावी अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती. मात्र राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना अगोदरच्या आदेशाप्रमाणेच २ जून रोजी तुरूंगात परत जावे लागले. त्यानंतर त्यांच्या याचिकेवर ५ जून रोजी सुनावणी झाली.
आता अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनासाठीचा त्यांचा अर्ज बुधवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला. तसेच केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. Arvind Kejriwal |
यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून त्यांच्या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्याऐवजी प्रचारसभा घेतल्या यावरूनच ते आजारी नाहीत, हे स्पष्ट होते. केजरीवाल न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याने त्यांना जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद ईडीकडून मागील आठवड्यात करण्यात आला होता.
हेही वाचा:
उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादवांची खेळी ठरली यशस्वी; सपाच्या स्ट्रॅटेजीमुळे बिघडले भाजपचे गणित





