Arvind Kejriwal : गॅस, कच्च्या तेलाची स्थिती आणखी बिघडणार; अरविंद केजरीवालांनी दिला इशारा
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तर आगामी काळात गॅस, कच्च्या तेलाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

Arvind Kejriwal : देशावर गॅस, कच्च्या तेलाच्या संभाव्य टंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. त्याकडे लक्ष वेधून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचे सत्र आरंभले आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तर आगामी काळात गॅस, कच्च्या तेलाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. आखाती युद्धाची धग आता भारतालाही जाणवू लागली आहे.
देशातील इंधन पुरवठ्याच्या आघाडीवर समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. त्यावरून विरोधकांच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संबंधित मुद्द्यावर केजरीवाल (Arvind Kejriwal) सोशल मीडियावरून व्यक्त झाले. देशभरात शैक्षणिक संस्था आणि रूग्णालये वगळता उर्वरित सर्व व्यावसायिक आस्थापनांचा गॅस (एलपीजी) पुरवठा बंद करण्यात आला आहे.
केवळ घरगुती वापरासाठी गॅस पुरवला जाईल, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी कुठल्याशा कारणांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकले आहेत. त्याचीच शिक्षा देश आज भोगतोय का, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा-सिद्धरामय्या
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा विचारात घेऊन केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना व्यावसायिक सिलिंडरच्या टंचाईने ग्रासले आहे.
त्यातून त्यांनी काही काळासाठी तरी हॉटेल, रेस्टॉरंट बंद ठेवणे भाग पडणार असल्याची धास्ती व्यक्त केली आहे. त्या शक्यतेची गांभीर्याने दखल घेत सिद्धरामय्या यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून साकडे घातले. त्यांनी पत्रातून बंगळुरूच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली.





