Arvind Kejriwal : पाच वेळा समन्स बजावूनही अरविंद केजरीवाल गैरहजर; ईडीने उचलले मोठे पाऊल

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पाच वेळा समन्स बजावला. परंतु केजरीवाल यांनी शुक्रवारी पाचव्यांदा ईडीसमोर हजर राहणे टाळले. चौकशीसाठी ईडीकडून बजावण्यात येणारे समन्स अवैध असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे.
त्यासाठी त्या केंद्रीय यंत्रणेने याआधी केजरीवाल यांना चार समन्स बजावले. मात्र, चारही वेळा ते हजर न राहिल्याने ईडीकडून पाचव्यांदा समन्स बजावण्यात आले. त्यानुसार, केजरीवाल यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा ईडीसमोर गैरहजर राहिले. अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावूनही ते टाळल्याने ईडीने दिल्ली न्यायालयात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
केजरीवाल यांच्याविरुद्ध ईडीने मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा आणि फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मद्य धोरणातील गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना याआधी चार वेळ समन्स बजावण्यात आले होते. पाचव्या वेळीही ते हजर न झाल्याने ईडीने गुन्हा नोंदविला.
7 फेब्रुवारीला होणार सुनावणी
ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात शनिवारी तक्रार दाखल केली आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर ही तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी न्यायाधीश यांनी ईडीचा काही युक्तिवाद ऐकला. तर, उर्वरित युक्तिवाद विचारात घेण्यासाठी 7 फेब्रुवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
केजरीवालांना तीन महिन्यात पाच वेळा समन्स
ईडीने तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकदाही हजर झाले नाहीत. पहिला समन्स 2 नोव्हेंबर, त्यानंतर 21 डिसेंबर, 3 जानेवारी, 19 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला पाठवण्यात आले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणासंदर्भात त्यांची चौकशी केली पण एजन्सीने त्यांना आरोपी बनवले नाही.





