‘या’ कारणामुळे अरूंधती रॉय यांचे पुस्तक तामिळनडूत अभ्यासक्रमातून वगळले; काय आहे पुस्तकात जाणून घ्या

चेन्नई – माओवाद्यांवर अरूंधती रॉय यांनी लिहलेले “वॉकिंग विथ द कॉम्रेड’ हे पुस्तक तामिळनाडूत एम ए इंग्लिशच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले. अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केल्यानंतर हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. द्रमुक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निर्णयाला विरोध केला आहे.
हे पुस्तक एम ए च्या तिसऱ्या वर्षाला शिकवले जात होते. त्याबाबत अभाविपकडून आमच्याकडे लिखीत तक्रार दाखल झाली होती. अनेक सिनेट सदस्यांनी त्या विरोधात मत नोंदवले होते. त्यामुळे ते पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे तिरूनेलवली येथील मनोन्मनीयम सुंदरनार विद्यापीठाचे कुलगुरू के. पित्चुमणी यांनी सांगितले.
हा अभ्यासक्रम निश्चित केलेल्या समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने या वादग्रस्त पुस्तकाऐवजी पद्म पुरस्कार विजेते पर्यावरणवादी एम. कृष्णा यांचे माय नेटिव्ह लॅंड एसे ऑन नेचर या पुस्तक सुचवले. त्याचा समावेश त्यात करण्यात आला.
या पुस्तकाचा समावेश केला गेला त्यावेळी या पुस्तकातील संवेदनशील भागाकडे दुर्लक्ष झाले असावे, मात्र त्या बाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ते पुस्तक अभ्यसक्रमातून वगळण्यात आले. शेवटी शिक्षण महत्वाचे आहे, वाद नव्हे, असे ते म्हणाले.
या पुस्तकात काय आहे
माओवाद्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या छत्तिसगढमधील जंगलात जाऊन तेथे फिरून माओवादी जंगलातून कसा कारभार करतात यावर “वॉकिंग विथ कॉम्रेड’ हे पुस्तक लिहले आहे. अरूंधती आणि माओवाद्यांमधील संभाषण प्रथम 2010 मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापून आले. त्यानंतर त्याचे पुस्तक तयार करण्यात आले.
अभावीपचा विरोध
रॉय यांचे हे पुस्तक माओवाद्यांचे समर्थन करते. त्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांवर पांघरूण घालते, असा आरोप अभाविपच्या तामिळनाडू शाखेने केला आहे. गेली तीन वर्ष हे पुस्तक अभ्यास क्रमात असणे खेदजनक आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांवर माओवादी तत्वज्ञान लादले जात होते, असे अभाविपने म्हटले आहे.
विरोधकांची भुमिका
द्रमुक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकण्यास विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी काय वाचावे हे राजकारणी ठरवणार असतील तर समाजाच्या उज्वल भविष्याचा नाश होईल, असे द्रमुकच्या युवा आघाडीच्या अध्यक्षा आणि खासदार कनिमोझी यांनी म्हटले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार एस. व्यंकटेशन यांनीही हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. तामिळनाडू पुरोगामी लेखक आणि कलाकारांच्या संघटनेचे सरचिटणीस अधवान धीतचान्य यांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी गुरूवारी सायंकाळी व्हर्चुअल बैठकीचे आयोजन केले आहे.





