Pune : केरळचे अरुण लाल यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर
Pune : पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुणे : केरळमधील रंगभूमी क्षेत्रात अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत असलेले अरुण लाल यांना यंदाचा प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ते ‘लिटल अर्थ स्कूल ऑफ थिएटर’चे कलात्मक संचालक असून, विविध नाट्यप्रकारांमध्ये प्रयोगशील काम करत त्यांनी केरळमधील रंगभूमी आणि नाट्यशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या विशेष समारंभात अरुण लाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिक्कीम केंद्राचे संचालक आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी सौती चक्रवर्ती यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहोळ्यानंतर अरुण लाल यांनी दिग्दर्शित केलेल्या मट्टीया या नाटकाचा प्रयोग देखील आयोजित करण्यात आला आहे.
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे हे १९ वे वर्ष असून रंगभूमीच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. २००४ मध्ये तन्वीरच्या स्मृतिप्रीत्यर्थ तन्वीरचे आई-वडील दीपा व डॉ. श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. याआधी हा पुरस्कार प्रसाद वनारसे, लकी गुप्ता, गणेश मंदार्थी, रुतुपर्ण बिस्वास आणि दुष्यंत गुणशेखर यासारख्या दिग्गजांना देण्यात आला आहे.
केरळमधील अरुण लाल हे अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत असून ‘लिटल अर्थ स्कूल ऑफ थिएटर’चे कलात्मक संचालक आहेत. त्यांनी ३० हून अधिक नाट्यनिर्मितींमध्ये अभिनय केला असून, विविध भाषा आणि शैलींतील ३५ हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
बालनाट्यांचाही त्यात समावेश आहे. पारंपरिक सादरीकरणाच्या पद्धती, शारीरिक अभिनय आणि केरळच्या कलरिपयट्टू या युद्धकलेचा त्यांच्या नाट्यशैलीवर प्रभाव आहे. २०१५ मध्ये केरळ संगीत नाटक अकादमीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राज्य पुरस्कार, २०१९ मध्ये META चा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार आणि २०२२ मध्ये ‘चविट्टू’ चित्रपटासाठी ५२ व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अवनावन कदंब पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
कोलकाता येथे जन्मलेले सौती चक्रवर्ती यांना भारतीय रंगभूमीवरील चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. १९८४ मध्ये रंगभूमीवरील प्रवास सुरू केलेल्या चक्रवर्ती यांनी २००१ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून डिझाइन आणि दिग्दर्शन या विषयांत पदवी घेतली. NSD रेपर्टरी कंपनीमध्ये सात वर्षे डिझायनर, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले.
‘चाणक्य विष्णुगुप्त’, ‘अपरिचित’, ‘अधांतर’, ‘कन्यादान’ यांसह अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून, अभिनेता म्हणून जवळपास एक हजार प्रयोगांत सहभाग घेतला आहे. ९० हून अधिक नाट्यनिर्मितींसाठी त्यांनी प्रकाशयोजना केली आहे. रंगमंच तंत्रज्ञान आणि प्रेक्षागृह रचनेचेही ते तज्ज्ञ आहेत. भारत रंग महोत्सवाचे तांत्रिक संचालक म्हणून त्यांनी जवळपास दशकभर काम केले असून, बर्लिन येथील यंग थिएटर वर्कर्स वर्कशॉपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिक्कीम केंद्राचे संचालक आहेत. प्रकाशयोजनेतील योगदानासाठी त्यांना २०१९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, २०१७ चा मनोहर सिंह स्मृती पुरस्कार, तपस सेन स्मृती पुरस्कार आणि नटसम्राट पुरस्कार प्राप्त झाले आहेत.





