नवी दिल्ली : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
दीर्घ काळापासून आजारी असलेल्या अरुण जेटली यांची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. जेटली यांचे पार्थिव एम्समधून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात आणण्यात आले असून, दुपारी 1 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता यमुना नदीच्या काठावरील निगमबोध घाटावर अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.