Election Commission of India : निवडणूक आयुक्तपदी अरूण गोयल यांची नियुक्ती

नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी अरूण गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. एक दिवस आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.
चालू वर्षी मेमध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा सेवानिवृत्त झाले. त्यामुळे निवडणूक आयोगातील तीन पैकी एक आयुक्तपद रिक्त होते. त्या रिक्त जागी गोयल यांची नियुक्ती झाली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्त होतील. त्यानंतर गोयल मुख्य निवडणूक आयुक्त बनतील.
अनुपचंद्र पांडे हे सध्या तिसरे आयुक्त आहेत. गोयल यांची नियुक्ती डिसेंबर 2027 पर्यंत आहे. ते 1985 च्या तुकडीमधील पंजाब केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते याआधी अवजड उद्योग सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातही त्यांनी कार्य केले. प्रशासकीय सेवेतून ते वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर पुढील महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.





