Supreme Court: सर्वोच्च न्यायालयही झाले ‘स्मार्ट’, ‘या’ कामांसाठी होतोय AI चा वापर

Artificial Intelligence use in Supreme Court: सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतेही काम जलद व अचुकरित्या करणे शक्य होते. भारताचे सर्वोच्च न्यायालय देखील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मागे राहिलेले नाही. न्यायालयीन कामातही एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आतापर्यंत एआयच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयाच्या 36,324 निर्णयांना हिंदी आणि 42,765 निर्णयांना प्रादेशिक भाषेत भाषांतरित करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयाची स्थानिक भाषेतील प्रत ई-एससीआर पोर्टलवर देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली. अर्जुन राम मेघवाल मेघवाल यांनी सांगितले की, उच्च न्यायालयांच्या एआय अनुवाद समित्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासंबंधीचे सर्व काम पाहत आहे.
या क्षेत्रांमध्ये होतोय एआयचा वापर
एआयचा वापर हा प्रामुख्याने अनुवाद, अंदाज वर्तवणे, प्रशाककीय कार्यक्षमतेत सुधारणा, एनएलपी, स्वयंचलित फाइलिंग, शेड्यूलिंग आणि चॅटबॉटच्या माध्यमातून संवाद साधणे, या क्षेत्रांमध्ये केला जात असल्याची माहिती मेघवाल यांनी दिली.
दरम्यान, याआधी माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी देखील एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी हिंदी व अन्य भाषेतील भाषांतराच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्वांसाठी उपलब्ध
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत. यासाठी न्यायालयाने वर्ष 2023 मध्ये ई-एससीआर न्यूट्रल साइटेशन प्रोजेक्ट लाँच केला होता. या वेबसाइटच्या माध्यमातून वकील, विद्यार्थी व इतर नागरिक न्यायालयाचे निर्णय वाचू शकतात.





