कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सृजनशीलतेला पर्याय ठरू शकणार नाही – मुकेश अंबानी

मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढविणे चांगले आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेला शरण जाण्याची गरज नाही. शेवटी मानवी सृजनशक्ती समृद्धी निर्माण करीत असते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.
पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी बोलताना अंबानी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सृजनशीलतेला पर्याय ठरू शकणार नाही. या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात श्रीमंत देश असेल याबद्दल मला खात्री आहे.
भारताचा विकास दर वाढत आहे आणि वाढणार आहे. मात्र वाढीव विकासदर साध्य करताना पर्यावरणाचा बळी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी भारत आगाामी काळामध्ये उत्सर्जन कमी करणार्या इंधनावर अधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले.
लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. मात्र यामुळे आपल्यावर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी येणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यासाठीच भारत सरकार ग्रीन एनर्जीवर भर देत आहे. भारतातील कंपन्यांनीही या क्षेत्रात आगेकूच करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सौरऊर्जा, पवन ऊर्जा या क्षेत्रात भारत मोठ्या ताकतीने आगकूच करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी चॅट जीपीटीसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आपली कार्यक्षमता आणि ज्ञान वाढविण्यासाठी जरूर केला पाहिजे. मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून राहून चालणार नाही. शेवटी आपल्यालाच विचार करून आपला मार्ग शोधायचा असतो असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सतत शिकावे लागणार आहे. एकदा शिकून झाल्यावर पुन्हा शिकण्याची गरज नाही असे समजणे चुकीचे आहे. तसेच समजले तर तुम्ही मागे पडाल असेल ते म्हणाले.





