Satara : भारती फाउंडेशनतर्फे रविवारी साताऱ्यात कलाकारी

सातारा : साताऱ्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच सर्व कलाप्रकार एकाच वेळी एका ठिकाणी सर्व कलारसिक सातारकरांना बघायला मिळाव्यात. यासाठी भारती फाउंडेशनच्या वतीने कलाकारीचे आयोजन करण्यात येते. उत्स्फूर्त आणि निमंत्रीत कलाकार अशा दोन विभागात ही कलाकारी- ४ रविवार, दि. १५ रोजी सकाळी ८ ते १२ यावेळेत शाहू उद्यान, गुरुवार बाग येथे होणार असल्याची माहीती भारती फाउंडेशनचे प्रमुख व नगरपालिकेचे माजी सभापती रविंद्र भारती यांनी दिली.
कलाकारीचे हे चौथे वर्ष आहे. यावेळी कलाकारीत शिल्पकला, चित्रकला, पॉटरी, ओरीगामी, रांगोळी, कॅलीग्रॉफी, गायन व वादन या कला प्रकारात निमंत्रीत ३० तर उत्स्फूर्त १५ कलाकार सहभागी होणार आहेत. निमंत्रित कलाकरामध्ये सुप्रसिध्द चित्रकार अमित ढाणे, सागर गायकवाड, प्रा. राहुल पगारे, संकेत धोरात, शिल्पकला प्रकारात सुप्रसिध्द शिल्पकार संजय कुंभार, रविंद्र कुंभार, कॅलिग्राफीत ओंकार पाटील, पॉटरीमध्ये वैशाली कदम, रांगोळी आकाश दळवी हे तर शास्त्रीय गायन व वादन प्रकारात न्यास म्युझिक ग्रुप, सरस्वती म्युझिक क्लासेस व स्वर सुगंध शहनाई ग्रुप आपली कला सादर करणार आहेत.
कलाकारी-४ चे उद्घाटन, प्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे, पुणे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कराडमधील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार दादासाहेब सुतार यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यावेळी तमाशा एक रांगडी गंमत, वारी एक आनंदयात्रा, पुणेरी ब्राम्हण, पुणे कीन ऑफ डेक्कन या छायाचित्र ग्रंथांचे निर्माते महाराष्ट्रातील सर्जनशील चित्रकार संदेश भंडारे यांच्या आषाढी वारी या विषयाला समर्पित निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे.
सातारकरांसाठी अनोखी पर्वणी
‘कलाकारी’ मध्ये कलात्मक वातावरणात विविध कलाविष्कारांचा नजराणा पेश होताना त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी सर्व कलारसिकांना प्राप्त होणार आहे, सातारकरांसाठी निश्चितच ही अनोखी पर्वणी असणार आहे. रंग, माती, शब्द व सुरांनी सजलेल्या संकल्पनेला कलारसिक सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. यावेळी पण सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कलाकारी टीम प्रमुख शिल्पकार महेश लोहार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती फाउंडेशन व कलाकारी टीम सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.





