“रोहित शेट्टीसह गोव्यात शूटिंग..” अर्शद वारसीने गोलमाल 5 बाबत केले भाष्य; जॉली एलएलबी 3 देखील येणार असल्याचे केलं स्पष्ट

मुंबई – अभिनेता अर्शद वारसीची वेब सीरिज ‘असुर 2’ नुकतीच रिलीज झाली आहे. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या मालिकेत अर्शद सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. या भूमिकेमुळे त्याला लोकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अर्शदच्या आजवरच्या सर्व कॉमेडी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. नुकतच अर्शदने एका मुलाखतीत आपल्या हिट चित्रपटांच्या पुढील पार्टबाबत भाष्य केलं. ज्यामध्ये जॉली एलएलबी 3,मुन्ना भाई 3 आणि गोलमाल फाईव्हचा समावेश आहे.
‘जॉली एलएलबी 3’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या फ्रँचायझीच्या दोनही चित्रपटांना अभूतपूर्व यश मिळालं आहे. नुकतंच अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत भाष्य केलं. एका मुलाखतीदरम्यान अर्शद वारसीने या चित्रपटाशी संबंधित माहिती दिली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम सुरू असल्याचे अभिनेत्याने यावेळी सांगितले. तसेच मुन्ना भाई 3 सध्या बनत नसल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
अर्शद म्हणाला की संजय दत्त, राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा यांना मुन्ना भाई 3 करायचा होता पण अद्याप ते जमू शकलेलं नाही. ‘जॉली एलएलबी 3’ निश्चितपणे येणार आहे त्यावर काम देखील सुरु आहे. पुढील वर्षी हा चित्रपट फ्लोरवर जाईल असं देखील अर्शद यावेळी म्हणाला. तसेच अर्शदने यावेळी गोलमाल चित्रपटाची देखील आठवण काढली.
रोहित शेट्टी आणि गोलमाल सिनेमा हे एक हिट समीकरण आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेले गोलमालचे सर्व पार्ट हिट झाले आहेत. आजही अनेकांना वाटत रोहित शेट्टी गोलमालचा पाचवा पार्ट लवकरच काढेल. अभिनेता अर्शद वारसीला सुद्धा याबाबत मोठी आशा आहे. तो म्हणतो,मला आशा आहे की एक दिवस रोहित शेट्टीचा फोन येईल आणि तो मला बोलावून म्हणेल गोव्यात गोलमाल 5 चे शूटिंग करत आहे लवकर ये.




