पुणे | आररर केंद्रीय मंत्र्यांच्या मिळकतीला टाळे ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराच्या मध्यवर्ती भागात डेक्कन परिसरातील एका केंद्रीय मंत्र्याशी संबंधीत मिळकत महापालिकेच्या कर संकलन विभागाने सील केली आहे. या मिळकतीची सुमारे साडेतीन कोटींची थकबाकी होती. तर, महापालिकेकडून नोटीसा बजावूनही हा कर भरला जात नव्हता.
अखेर महापालिकेने तीन मजल्याच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत. मात्र, एरवी एक मिळकत सील केली तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. महापालिकेने नोटीसा दिल्यानंतर प्रत्येक वेळी पालिकेवर दबाव टाकला जात होता.
महापालिकेकडून मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई सुरू आहे. या मंत्री महोदयांच्या मिळकतींची थकबाकी असल्याने पालिकेने त्यांनाही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने नोटीसा बजाविण्यात येत होत्या. मात्र, प्रत्येक नोटीस नंतर पालिकेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता.
त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती. काही महिन्यांपूर्वी पालिकेने नोटीस बजाविण्यात आल्यानंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर, पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, मंगळवारी अखेर पालिकेने या मिळकतीला टाळे ठोकले असून थकबाकीपोटी ती सील करण्यात आली आहे.




