पुणे | मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या टोळीला अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येरवड्यातील ऐतीहासीक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणाऱ्या टोळीस येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीने दि.४ जूनला मंदिरातील सहा दानपेट्या फोडून दोन लाखाची रोकड चोरुन नेली होती. तपासात पोलिसांनी पुणे ते अहमदनगरपर्यंत जवळपास २०० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. सलग सव्वा दोन महिने तपास केल्यानंतर टोळी हाती लागली.
स्वरुप राजेश चोपडे (वय २१ सध्या रा. मांजरी बुद्रुक, पुणे. मुळ गाव नागपूर) आणि अथर्व वाटकर (रा.नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुधीर वसंतराव बांबुरे (वय ६७ रा. शनी मंदिर येरवडा गाव) यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तारकेश्वर मंदिरात पावती देऊन देणगीदारांकडून देणगी स्विकारली जाते तसेच गुप्त देणगीदारांसाठी गुप्तदान पेट्यांची व्यवस्था आहे. मंदिर देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टकडून सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.
मात्र, दि, ४ जूनला रात्री दिड ते पहाटे पावणेसहाच्या सुमारास दानपेट्या फोडल्या. या गुन्ह्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,पोलीस निरीक्षक छगन कापसे, पल्लवी मेहेर यांचे मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक स्वप्निल पाटील व पोलीस अंमलदार तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी पुणे ते अहमदनगर येथील अहिल्यानगरपर्यंत जवळपास २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा माग काढला.
तसेच पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन या महत्वपुर्ण गुन्ह्यातील आरोपी शोधले. सदर गुन्ह्यातील शयीत आरोपी राजेश चोपडे यास दि. ४ ऑगस्टला पुणे रेल्वे स्टेशन येथून सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे इतर साथीदार राजन पटेल, अक्षय शाहू, अथर्व वाटकर, अमित शेरीया (सर्व रा. नागपुर शहर) यांच्यासह गुन्हा केल्याची कबूली दिली.
यातील आरोप अथर्व वाटकर यास नागपूर शहर येथून दि.९ ऑगस्टला अटक केली. या गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या पैकी एक लाख पाच हजार हस्तगत करण्यात आले. या गुन्हयात वापरलेली चोरीची टिव्हीएस ज्युपिटर मोटार सायकल देखील जप्त करण्यात आली.
मंदिर चोरीत सराईत टोळी
अटक दोन्ही आरोपींचे रेकॉर्ड नाही मात्र त्यांच्या साथीदारांचे रेकॉर्ड आहे. ही टोळी राज्यातील विविध शहरांतील मंदिरांची रेकी करुन चोऱ्या करते. संबंधीत शहरात एक दोन दिवस राहून मंदिराची पहाणी केल्यावर रात्री मंदिरे फोडून कारने नागपूरकडे पळ काढला जात होता.





