Allu Arjun | दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्याला त्याच्या घरातून अटक केली होती.
त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयाविरोधात अभिनेत्याने तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केले होते. यावर अभिनेत्याला दिलासा देत हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र त्याला एक रात्र तुरुंगातच राहावे लागले. शनिवारी सकाळी त्याची सुटका करण्यात आली.
अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर
अल्लू अर्जुनसाठी शुक्रवारीचा दिवस खूप कठीण होता. दुपारी 12 वाजता अभिनेत्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं.
कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. याचदरम्यान, अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर त्याला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने त्याला जामीन दिला होता.
अल्लू अर्जुनने केला आरोप
अटकेच्या वेळी अल्लू अर्जुनने त्याच्या पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ‘फ्लॉवर नही आग है में’ लिहिलेला पांढरा रंगाचा हुडी घातला होता. अल्लू अर्जुनने सांगितले की, त्याला कपडे बदलण्यासाठीही वेळ दिला गेला नाही आणि पोलिस त्याच्या बेडरूममध्ये गेले. लिफ्टमध्ये चढतानाही तो शॉर्ट टी-शर्टमध्ये होता. नंतर पोलिसांची परवानगी घेऊन त्याने कपडे बदलले.
अल्लू अर्जुनवर आरोप काय?
अल्लू अर्जुन 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी तेथे जमाव जमला आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला. ३५ वर्षीय रेवती असे मृत महिलेचे नाव आहे. ती मुलगा आणि पतीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चेंगराचेंगरीत मुलगाही जखमी झाला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन, अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
महिलेचा पती केस मागे घेण्यास तयार
दरम्यान, चेंगराचेंगरीत ठार झालेल्या महिलेच्या पतीने केस मागे घेण्यास तयार असल्याचे सांगितले. “असे काही होईल याची त्याला कल्पना नव्हती. आम्ही अभिनेत्यावरील केस मागे घेण्यास तयार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
अल्लू अर्जुनकडून 25 लाखांची मदत
या महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच अभिनेता अल्लू अर्जुननेही शोक व्यक्त केला होता. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन 25 लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
अल्लू अर्जुनची सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया
अभिनेता अल्लू अर्जुनची सुटका झाल्यानंतर त्याने माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्याने सर्व चाहत्यांचे आभार मानले. “घडलेली घटना खूप दुर्दैवी होती. मी पुन्हा एकदा त्याबद्दल शोक व्यक्त करतो. मी कायम पीडितेच्या कुटुंबाच्या मदतीसाठी हजर असेल. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असून तपासात पूर्ण सहकार्य करेन, ” असेही त्याने सांगितले.
हेही वाचा :
दिल्लीच्या अनेक शाळांना आज पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी ; आठवड्यातील तिसरी धमकी