नगर – तरुणीशी मैत्री करून तिची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या दोन तरुणांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. राहुल संजय शिरसाठ, विशाल सदानंद साबळे (दोघे रा. शेलूखडसे, ता. रिसोड, जि. वाशिम) असे अटक केलेल्या तरुणांचे नावे आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगर शहरातील एका तरुणीची राहुल शिरसाठ याच्याशी व्हॉट्सऍपद्वारे मैत्री झाली होती. राहुल याने या तरुणीकडे अश्लील फोटोची मागणी केली. त्यानंतर या तरुणीने त्यास तसे पाठविले. राहुलने पुन्हा या तरुणीकडे अशाच फोटोंची मागणी केली. तसेच तसे फोटो न दिल्यास पूर्वी पाठविलेले फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करील, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित तरुणीने याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी विषयी माहिती काढली.
आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या शेलूखडसे (जि. वाशिम) या गावी जाऊन शोध घेतला. तिथे राहुल व त्याला मदत करणारा विशाल साबळे याला ताब्यात घेतले. राहुलकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने विशालच्या मोबाइलवरून पीडित तरुणीला अश्लील संदेश पाठविले व मुलीचे इंस्टाग्रामवर फोटो टाकल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, कैलास शिरसाठ, सुशील वाघेला, विष्णू भागवत, नितीन शिंदे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, रवींद्र टकले, सुमित गवळी, भारत इंगळे, तनाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.