Robin Uthappa : रॉबिन उथप्पा विरोधात अरेस्ट वॉरंट, नक्की प्रकरण काय?

Robin Uthappa Arrest Warrant: भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्याने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पैसे जमा केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकसान भरपाई न दिल्यास उथप्पाला 27 डिसेंबरनंतर अटक केले जाऊ शकते.
उथप्पा बंगळुरू स्थित सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे. कंपनी जवळपास 23,36,602 रुपये भरपाई देऊ शकली नाही. त्यामुळे रॉबिन उथप्पाकडून ही रक्कम वसूल केले जाईल. उथप्पाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीचे पैसे तर कापले, परंतु ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याचा आरोप आहे. याबाबत क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी अटक वॉरंट जारी केले आहे.
उथप्पाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्याकडे 27 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे देण्याची मुदत आहेत. 27 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना ही रक्कम न दिल्यास त्याला अटक केली जाऊ शकते.
दरम्यान, रॉबिन उथप्पाने सप्टेंबर 2022 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारताकडून 46 वनडे खेळताना 934 धावा केल्या आहेत. तर 13 टी20 सामन्यात 249 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स, कोलकत्ता नाइट राइडर्स संघाचा देखील भाग होता.





