प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत; लखनौ न्यायालयाकडून ‘त्या’ प्रकरणी अटक वॉरंट

नवी दिल्ली – हरियाणाची डान्सर आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी सपना चौधरी अडचणीत आली असून पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात लखनौ येथील न्यायालयाने तिच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. तिला न्यायालयात हजर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे प्रकरण 2018 मधील आहे. त्यावेळी सपना चौधरीचा एक डान्सचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाचे तिकीट ऑनलाइन आणि ऑफलाइन असे 300 रुपयांनी विकले गेले होते. मात्र, त्या कार्यक्रमाला सपना आली नव्हती.
आयोजकांनीही ज्यांना तिकिटे विकली होती त्यांना पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे प्रचंड गोंधळ आणि तोडफोड झाली होती. तेव्हा सपना चौधरी आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता याच प्रकरणात तिच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आले आहे. तसेच शोसाठी ऍडव्हान्स दिल्यानंतरही सपना चौधरी गैरहजर राहिली त्यामुळे आयोजकांनीही तिच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले होते. याच प्रकरणात तिच्या विरोधात नोव्हेंबर 2021 मध्येही अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. तेव्हा ती न्यायालयात हजर झाली होती व तिने पैसे भरून जामीन मिळवला होता.





