जगभरात एकाच दिवसात आढळले उच्चांकी 1 लाख 89 हजार करोनाबाधित

जीनिव्हा -जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिलेल्या माहितीनुसार रविवारी जगभरात 1 लाख 89 हजारांवरून अधिक नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसाचा उच्चांक ठरला.
जगभरात आठवडाभरापूर्वी 1 लाख 83 हजारांहून अधिक बाधितांची नोंद एका दिवसात झाली होती. तो उच्चांक रविवारी मागे पडला. त्यासाठी ब्राझील, अमेरिका आणि भारतातील बाधितांची संख्या कारणीभूत ठरली.
रविवारी ब्राझीलमध्ये तब्बल 46 हजार 800 तर अमेरिकेत 44 हजार 400 बाधित आढळले. तर भारतात 19 हजार 906 बाधितांची नोंद झाली. जगभरातील करोनाबाधितांच्या संख्येने 1 कोटीचा, तर बळींच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
करोना संकटाचा सर्वांधिक तडाखा अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील बाधित आणि बळींची संख्या जगाच्या एक-चतुर्थांशपेक्षा अधिक आहे. बाधित आणि बळींच्या संख्येत ब्राझील जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात अमेरिकेपेक्षा निम्मे म्हणजे 13 लाख बाधित आहेत. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 57 हजारांहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत.
बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्या देशात 6 लाख 41 हजार बाधितांची नोंद झाली आहे. रशियापाठोपाठ भारत बाधित संख्येत चौथ्या स्थानी आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील करोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पाकिस्तानने 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर बांगलादेशात 1 लाख 41 हजारांहून अधिक बाधित आहेत. ते देश अनुक्रमे बाराव्या आणि सतराव्या स्थानांवर आहेत.





