लष्कर प्रमुख नरवणे यांना नेपाळ सैन्य दलाची जनरल श्रेणी

काठमांडू – भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना नेपाळच्या सैन्य दलातील मानद जनरल श्रेणी प्रदान करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात जनरल नरवणे नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी एका समारंभामध्ये त्यांना ही मानद श्रेणी बहाल केली जाणार आहे. नेपाळच्या सैन्य दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
जनरल मनोज नरवणे यांच्या नेपाळ दौऱ्याची निश्चिती याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली होती. नेपाळ सरकारकडून या दौऱ्याला मंजूरीही देण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात करोनाच्या साथीमुळे दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊन लागू केला गेला होता. त्यामुळे त्यांचा हा दौरा लांबणीवर टाकला गेला होता. नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी यांच्या हस्ते जनरल मनोज नरवणे यांना ही मानद श्रेणी प्रदान केली जाणार आहे.
जनरल मनोज नरवणे यांचा नेपाळ दौरा म्हणजे नेपाळने कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भारतीय भूभागांना आपल्या सीमेमध्ये दर्शवणारा सुधारीत नकाशा प्रसिद्ध केल्यापासूनचा पहिलाच उच्चस्तरिय दौरा आहे.





