लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केला लडाख दौरा

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर चीन विरुद्ध संघर्षाची स्थिती कायम असताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी लडाखचा दौरा केला. त्यांनी एलएसी आणि पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी ८.३० वाजता ते लडाखच्या फॉरवर्ड भागामध्ये पोहोचले. आज संध्याकाळपर्यंत ते दिल्लीला परतण्याची शक्यता आहे.
लष्करप्रमुख नरवणे यांनी रेचिंग ला सह फॉरवर्ड भागांना भेट दिली. आपल्या सैन्याच्या तयारीबाबत जीओसी, फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि अन्य लोकल कमांडर्सनी त्यांना माहिती दिली.
लष्कराने टि्वटर हँडलवरुन ही सर्व माहिती दिली आहे. दोन महिन्याच्या खंडानंतर १८ डिसेंबरला लडाख सीमेवरील स्थितीसंदर्भात भारत आणि चीनमध्ये राजनैतिक चर्चा झाली.
लवकरच कुठलाही तोडगा दृष्टीपथात येण्याची शक्यता नाहीय. या भागात दादागिरी करणाऱ्या चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर जशास तसे उत्तर दिले आहे. दोन्ही बाजूचे जवळपास ५० हजार सैनिक इथे तैनात आहेत. दोन्ही देशांनी सर्व अत्याधुनिक शस्त्र सज्ज ठेवली आहेत.





