Robbery: माजी नायब तहसीलदारांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 7 तोळे सोने, रोकड लंपास
Robbery: ५ अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे ७ तोळे सोने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.

Robbery: नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी निवृत्त नायब तहसीलदार मच्छींद्र यशवंत बर्डे यांच्या वस्तीवर धाडसी दरोडा टाकला. ५ अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे ७ तोळे सोने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ५ हत्यारधारी चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी दौलत बर्डे यांनी आपल्या परवानाधारी रायफलने चोरट्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी उलट त्यांच्यावरच हल्ला करून हातातील रायफल हिसकावून घेतली. या झटापटीत दरोडेखोरांनी दौलत बर्डे यांच्या डोळ्यावर आणि कपाळावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले, तर मच्छींद्र बर्डे यांच्या हातालाही इजा झाली.
दरोडेखोरांनी घरातील सर्वांचे हात-पाय बांधून चाकूचा धाक दाखवला आणि कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. जाताना त्यांनी रायफलही सोबत नेली होती, जी सकाळी परिसरातील ऊसात आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनीही बर्डे कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. या घटनेमुळे भेंडा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.





