Ariel Seidman : दक्षिण आफ्रिकेने इस्रायलचे उपराजदूत एरियल सीडमन (Ariel Seidman)यांची हकालपट्टी केली आहे आणि त्यांना ७२ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. उपराजदूत सीडमन यांनी इस्रायली सोशल मीडिया पोस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचा वारंवार अपमान केला, असे दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेला इस्रायली अधिकाऱ्यांच्या भेटीची जाणीवपूर्वक माहिती देण्यात आली नाही, असे करणे हे राजनैतिक नियम आणि पद्धतींचे उल्लंघन आहे, असेही दक्षिण आप्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. २०२३ मध्ये इस्रायलने आपला राजदूत परत बोलावल्यानंतर एरियल सीडमन हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात वरिष्ठ इस्रायली राजदूत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे इस्रायलशी राजनैतिक संबंध आधीच ताणले गेले आहेत. हे प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेने गाझामध्ये पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध नरसंहार केल्याचा आरोप करत संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.