AFA : लिओनेल मेस्सीचा सन्मान करण्यासाठी अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने घेतला मोठा निर्णय….

स्पेन – जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी निवृत्त झाल्यानंतर अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून त्याची १० क्रमांकाची जर्सीही निवृत्त केली जाणार आहे. मेस्सीचा सन्मान करण्यासाठी अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने हा निर्णय घेतला आहे. मेस्सीने अद्याप आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली नाही.
मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वकरंडक जिंकला होता. अर्जेंटिनाचा संघ ३६ वर्षांनंतर विश्वविजेता ठरला. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. स्पॅनिश वृत्तपत्र मार्काने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ तापियांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मेस्सी जेव्हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होईल तेव्हा त्याच्या १० क्रमांकाची जर्सी इतर कोणालाही घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. मेस्सीच्या सन्मानार्थ १० क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आपण एवढे करू शकतो.
खरे तर २०१४च्या विश्वकरंडकाच्या फायनलमध्ये जर्मनीकडून झालेला पराभव आणि कोपा अमेरिकेत चिलीकडून झालेल्या पराभवानंतर मेस्सी यापुढे खेळणार नाही, अशी शंका निर्माण झाली होती. तो २०१६ मध्ये निवृत्तही झाला, पण त्यानंतर त्याने पुनरागमन केले आणि तेव्हापासून त्याने उत्तम कामगिरी दाखवली. काही आठवड्यांपूर्वी २०२२च्या विश्वकरंडकादरम्यान मेस्सीने परिधान केलेल्या ६ जर्सी लिलावात ७.८ मिलियन डॉलर्स (सुमारे ६४ कोटी रुपये) मध्ये विकल्या गेल्या होत्या.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच बीसीसीआयने टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीची जर्सी क्रमांक-७ त्याच्या सन्मानार्थ निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीपूर्वी बीसीसीआयने सचिन तेंडुलकरच्या १० क्रमांकाच्या जर्सीलाही हा सन्मान दिला होता.
नियम काय सांगतो?
मेस्सीपूर्वी डिएगो मॅराडोनाही अर्जेंटिनाकडून खेळताना १० नंबरची जर्सी घालायचे. अर्जेंटिनाने २००२ मध्ये मॅराडोनाच्या सन्मानार्थ ही जर्सी रिटायर करण्याचा प्रयत्न केला, परंतु आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या कठोर नियमांमुळे हे होऊ शकले नाही. फिफाच्या नियमांनुसार, संघांनी १ ते २३ क्रमांक वापरणे आवश्यक आहे. अशा स्थितीत भविष्यात या क्रमांकाची जर्सी घेण्याची सक्ती कोणाला होऊ शकते.
मेस्सीचे अर्जेंटिनासाठी १०६ गोल
मेस्सीने अर्जेंटिनासाठी १८० सामन्यांत १०६ गोल केले आहेत. त्याने संघाला २०२१ कोपा अमेरिका आणि २०२२चा विश्वकरंडक जिंकून दिला आहे. मेस्सी २०२६च्या फिफा विश्वकरंडकात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्याआधी त्याला २०२४ मध्ये अर्जेंटिनासाठी दुसऱ्यांदा कोपा अमेरिका कप जिंकण्याची इच्छा आहे.





