Venezuela Earthquake 2026 : मैदानात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा खेळाडू एका रात्रीत झाला पोरका! व्हेनेझुएलातील भूकंपाने हिरावला संसार
Venezuela Earthquake 2026 : या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीने अर्जेंटिनाचा दिग्गज आणि अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याचा सुखी संसार पूर्णपणे मोडला आहे.

Venezuela Earthquake 2026 Argentina Footballer Lucas Trejo Family Missing Post : व्हेनेझुएलामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाने भीषण हाहाकार माजवला असून शेकडो निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीने अर्जेंटिनाचा दिग्गज आणि अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो (Lucas Trejo) याचा सुखी संसार पूर्णपणे मोडला आहे. कोपा व्हेनेझुएला स्पर्धेच्या तयारीसाठी ट्रेजो आपल्या संघासोबत काराकासमध्ये होता. त्याच वेळी त्याला बातमी मिळाली की, त्याचे कुटुंब राहत असलेली बहुमजली इमारत भूकंपात पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. या धक्कादायक बातमीने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
एकापाठोपाठ एक दोन भीषण धक्के; ला गुएरामध्ये हाहाकार!
बुधवार, २४ जून २०२६ च्या रात्री व्हेनेझुएलाची धरती एकापाठोपाठ एक झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरली. पहिला धक्का ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, तर लोक यातून सावरण्यापूर्वीच ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अत्यंत घातक धक्का बसला. राजधानी काराकासपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ला गुएरा (प्राया ग्रांडे) या किनारी भागात या भूकंपाने सर्वाधिक विनाश केला. याच ठिकाणी लुकास ट्रेजो यांचे घर होते. मूळचे अर्जेंटिनाच्या कॉर्डोबा येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय लुकास याला मैदानावरील त्याच्या मजबूत खेळामुळे ‘द जनरल’ म्हणून ओळखले जाते, परंतु या दुर्घटनेने तो पूर्णपणे खचून गेला आहे.
“माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा”; सोशल मीडियावर साद
BUSCAN A LA FAMILIA DE UN FUTBOLISTA ARGENTINO TRAS LOS TERREMOTOS EN VENEZUELA
Después de que se registraran dos terremotos de magnitud 7,2 y 7,5 en Venezuela, varias personas se encontrarían desaparecidas. Aunque todavía no hay una cifra oficial, se confirmó que se desconoce… pic.twitter.com/ND8ELDiqT4
— infobae (@infobae) June 25, 2026
आपल्या कुटुंबाची कोणतीही माहिती न मिळाल्याने हताश झालेल्या ट्रेजोने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करून जगभरातील चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्याने लिहिले की, “प्राया ग्रांडेमधील आमची इमारत पूर्णपणे कोसळली आहे. मला माझ्या कुटुंबाबद्दल काहीही माहिती नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मला फक्त एवढीच आशा आहे की ते त्या वेळी तिथे नसावेत.”
ट्रेजोने त्याची पत्नी यानी, मुलगा आरोन आणि मुलगी ऐनहोआ यांच्या सुरक्षिततेची काहीही माहिती असल्यास ती बचाव पथकाला देण्याचे आवाहन केले आहे. अनुभवी डिफेंडर असलेला ट्रेजो सध्या व्हेनेझुएलाच्या मारिटिमो क्लबसाठी खेळतो. यापूर्वी त्याने युरोप, कोलंबिया, पेरू आणि मेक्सिकोमधील अनेक नामांकित क्लब्सचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या संपूर्ण क्रीडा जगतातून त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जात आहे.


