Antonio Rattin Death : फुटबॉलमधील ‘रेड अन् येलो कार्ड’चा जन्मदाता हरपला! अर्जेंटिनाचे महान कर्णधार अँटोनियो रॅटीन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन
Antonio Rattin Death : अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार अँटोनियो उबाल्डो रॅटीन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे.

Argentina Football Legend Antonio Ubaldo Rattin Death : जागतिक फुटबॉल विश्वातून एक अत्यंत अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार अँटोनियो उबाल्डो रॅटीन (Antonio Ubaldo Rattin) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे अर्जेंटिनासह जगभरातील फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. रॅटीन यांची गणना फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम मिडफिल्डर आणि कर्णधारांमध्ये केली जाते. त्यांनी १९५९ ते १९६९ या काळात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले असून, १९६२ आणि १९६६ च्या फिफा विश्वचषकात ते खेळले होते.
१९६६ मधील तो ऐतिहासिक वाद अन् राणीचा ‘रेड कार्पेट’!
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे (AFA) अध्यक्ष क्लाउडिओ तापिया यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, त्यांना अर्जेंटिना फुटबॉलचा ‘निर्विवाद आयकॉन’ म्हटले आहे. अँटोनियो रॅटीन १९६६ च्या इंग्लंड विश्वचषकात अर्जेंटिनाचे कर्णधार होते. त्या विश्वचषकातील क्वार्टर फायनलमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना एक अशी ऐतिहासिक घटना घडली, ज्याने जागतिक फुटबॉलचे नियम कायमचे बदलले. त्या काळात फुटबॉलमध्ये पिवळे (Yellow) आणि लाल (Red) कार्ड दाखवण्याची पद्धत नव्हती. सामन्यादरम्यान जर्मन रेफ्री रुडोल्फ क्रेटलिन यांनी रॅटीन यांना थेट मैदान सोडण्याचा आदेश दिला.
#ProfundoDolor La Asociación del Fútbol Argentino expresa su más profundo pesar por el fallecimiento de Antonio Ubaldo Rattín, histórico emblema de Boca Juniors y de la Selección Argentina. Acompañamos con un fuerte abrazo a su familia, seres queridos en este difícil momento. pic.twitter.com/8lWijPJPGn
— AFA (@afa) July 11, 2026
आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत रॅटीन यांनी रेफ्रींचा निर्णय समजून घेण्यासाठी अनुवादकाची (Translator) मागणी केली आणि मैदान सोडण्यास नकार दिला. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या रॅटीन यांनी मैदानाबाहेर जाताना थेट महारानी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी आरक्षित असलेल्या ‘रेड कार्पेट’वर ठिय्या मांडला आणि स्टेडियममधून बाहेर पडताना ब्रिटिश झेंडा रागाने चुरगळला.
याच घटनेमुळे फिफाने लागू केली ‘कार्ड सिस्टीम’ –
🕊️ El fútbol argentino está de luto. A los 89 años falleció Antonio Ubaldo Rattín y lo recordamos con uno de los momentos más emblemáticos de la historia de los Mundiales, ocurrido en Inglaterra 1966.
🏟️ Capitán de la Selección argentina, Rattín fue expulsado en el duelo ante… pic.twitter.com/0GWYP0pJGJ
— Perfil.com (@perfilcom) July 11, 2026
रॅटीन यांच्या या ऐतिहासिक बंडखोरीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर इतका प्रचंड प्रभाव पडला की, फिफाला (FIFA) आपल्या नियमांत बदल करावा लागला. रेफ्रींनी दिलेली शिक्षा खेळाडूंना आणि प्रेक्षकांना स्पष्ट समजावी, म्हणून फिफाने १९७० च्या विश्वचषकापासून अधिकृतपणे ‘येलो आणि रेड कार्ड’ (Card System) नियम लागू केला.
क्लब फुटबॉलमध्येही गाजवले वर्चस्व –
रॅटीन यांनी आपले संपूर्ण व्यावसायिक क्लब करिअर ब्युनस आयर्सच्या ‘बोका जूनियर्स’ या एकाच क्लबसाठी खेळले. त्यांनी १९५६ ते १९७० दरम्यान ३८२ सामने खेळत २८ गोल केले आणि ४ लीग विजेतेपदे पटकावली. निवृत्तीनंतर त्यांनी बोका जूनियर्सचे प्रशिक्षक म्हणून काम केले आणि नंतर ते राजकारणातही सक्रिय झाले होते.





