Satara | साताऱ्यातील हेरिटेज इमारतींचा परिसर आता ‘नो फ्लेक्स झोन’

सातारा, (प्रतिनिधी)- शहरातील हेरिटेज इमारतींचा परिसर ‘नो हॉकर्स झोन’ व ‘नो फ्लेक्स झोन’ म्हणून जाहीर करण्याचा विषय पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला.
या व्यतिरिक्त शहर व हद्दवाढ भागातील रस्ते दुरुस्ती, नवीन पथदिवे बसविण्यासह पथदिव्यांचे डीजिटल मॉनिटरिंग, पोवई नाका येथे शिवथीर्थ नावाचा फलक लावणे, गुरुवार बागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यांसह २८८ विषयांना मंजुरी देण्यात आली. दोन विषय दुबार झाल्याने ते रद्द करण्यात आले.
सातारा पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी चार वाजता मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण,
संगणक अभियंता स्मिता पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम, लेखापाल महेश सावंत, विद्युत अभियंता अविनाश शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अजेंड्यावर शहर विकास व कार्योत्तर मंजुरीचे २९० विषय घेण्यात आले होते. सभा सचिव अतुल दिसले यांनी प्रत्येक विषयाचे तपशीलवार वाचन केले. कास तलाव परिसराचा विकास करणे, माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात १५० किलो वॅट क्षमतेचा सोलर संच उभारणे, शहर व हद्दवाढ भागात नवीन पथदिवे बसविणे,
ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बेंच बसविणे, जकातवाडी येथे जल तपासणी प्रयोगशाळा सुरू करणे, पालिकेत हिरकणी कक्ष स्थापन करणे, शाहू कलामंदिर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करणे, शहरात ग्रेनाईट बोर्ड बसविणे, रस्ते दुरुस्ती, गटारांची निर्मिती यांसह २८८ विषय यावेळी मंजूर करण्यात आले.





