‘मुलाला चित्रपटसृष्टीत यावसं वाटलं तर…’; आर माधवनच्या उत्तराने वेधले साऱ्यांचे लक्ष

मुंबई – बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मुलं सिनेक्षेत्राकडे वळाली आहेत. मात्र अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याला अपवाद आहे. स्विमिंगमध्ये वेदांत उत्तम करिअर करत आहे. या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत त्याने वडिलांसह आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केले आहे. मात्र एका मुलाखतीत वेदांतचे चित्रपटसृष्टीत पदापर्ण करण्याबाबत आर माधवनला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आर माधवनने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भविष्यात वेदांत सिनेक्षेत्रात येऊ पहात असेल तर यावर तुझे मत काय असेल? असा प्रश्न आर माधवनला यावेळी करण्यात आला. यावर माधवन म्हणाला, “मला चित्रपटसृष्टी खूप आवडते. यासारखा दूसरा व्यवसाय नाही. माझ्या मुलाला जेव्हाही या क्षेत्रात येऊ वाटेल तेव्हा मी त्याला अडवणार नाही, फक्त हे क्षेत्र फारच आव्हानांनी भरलेलं आहे याची त्याला जाणीव हवी. मी आजवर त्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून अडवलेलं नाही. त्याला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर तो त्याचा निर्णय असावा, मी नक्कीच त्याला मदत करेल”
पुढे माधवन म्हणाला, “वेदांत सध्या त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, हे पाहून मला आनंद होतो. त्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. ऑलिंपिकसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यायची आहे. सध्या त्याला मिळणारी ही प्रसिद्धी ही त्याच्या करिअरसाठी योग्य नसल्याने आम्ही जाणून बुजून त्याला या प्रसिद्धीपासून लांब ठेवत आहोत.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वेदांत माधवनने मलेशियामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली. स्वत: आर माधवनने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून आपल्या मुलाच्या या यशाची माहिती दिली होती. याशिवाय मागील काही वर्षांत वेदांतने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विजेते पदाचा मान पटकावला आहे.
आर माधवनने गेल्या वर्षी ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ मधून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने अभिनयही केला आहे. हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.





