Mental Health: लोकांसमोर बोलताना घाबरता? सतत ‘लोक काय म्हणतील’ याची भीती वाटते? मग हे सोशल फोबियाचं लक्षण तर नाही ना?
Mental Health बोलण्याची वेळ आली आणि हृदयाची धडधड वाढली, तर तीन ते चार वेळा खोल श्वास घ्या. यामुळे शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते.

Mental Health: ऑफिसमधील काम तुम्ही व्यवस्थित करता, अभ्यासही चांगला करता, पण चार लोकांसमोर बोलायची वेळ आली की घाबरायला होतं? मीटिंगमध्ये प्रश्न विचारायचा असो, स्वतःचं मत मांडायचं असो किंवा एखाद्या समूहात सहभागी व्हायचं असो, अनेक जणांना प्रचंड ताण आणि भीती जाणवते. ही समस्या साधी लाजाळूपणाची नसून काही वेळा ती ‘सोशल फोबिया’ किंवा ‘सोशल अॅन्झायटी डिसऑर्डर’ असू शकते.
सोशल फोबिया (Social Phobia) ही एक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे. यामध्ये व्यक्तीला लोकांसमोर बोलण्याची, नवीन लोकांना भेटण्याची, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याची किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची भीती वाटते. (Mental Health)
या भीतीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ‘लोक माझ्याबद्दल काय विचार करतील?’ हा सतत डोक्यात येणारा विचार. त्यामुळे अनेक जण स्वतःला खूप दडपून ठेवतात. एखादा प्रश्न विचारण्यापूर्वी ते अनेक वेळा मनात त्याचं नियोजन करतात. मात्र, जास्त विचार करता करता ते गोंधळून जातात आणि शेवटी काहीच बोलत नाहीत.
अनेकदा असं होतं की, तुमच्या मनात असलेली कल्पना किंवा मत दुसरी एखादी व्यक्ती मांडते आणि त्याचं कौतुकही होतं. तेव्हा मनात खंत निर्माण होते की, ‘हेच तर मला सांगायचं होतं.’ (Mental Health)
असं वारंवार घडत राहिलं की व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात आणि तणाव वाढू लागतो. हळूहळू याचा परिणाम कामावर, अभ्यासावर आणि वैयक्तिक आयुष्यावरही होऊ शकतो. (Mental Health)

Mental Health: लोकांसमोर बोलताना घाबरता? सतत ‘लोक काय म्हणतील’ याची भीती वाटते? मग हे सोशल फोबियाचं लक्षण तर नाही ना?
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीकडून चुका होणं अगदी स्वाभाविक आहे. मोठ्या पदावरील अधिकारीसुद्धा कधी कधी अडखळतात, चुकीचं बोलतात किंवा एखादी गोष्ट विसरतात. त्यामुळे स्वतःवर परिपूर्ण असण्याचा अनावश्यक ताण घेऊ नये. (Mental Health)
स्वतःबद्दल सकारात्मक विचार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण विचारत असलेला प्रश्न किंवा आपण देत असलेली सूचना महत्त्वाची आहे, हे स्वतःला पटवून द्या. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. (Mental Health)
या समस्येवर मात करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. जर ऑफिसमध्ये मीटिंग असेल, तर आधीच त्याचा विषय समजून घ्या. त्याबद्दल थोडा अभ्यास करा. विषयाची माहिती असेल तर मनातील भीती आपोआप कमी होते. (Mental Health)
बोलण्याची वेळ आली आणि हृदयाची धडधड वाढली, तर तीन ते चार वेळा खोल श्वास घ्या. यामुळे शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते.
सुरुवातीला मोठं भाषण देण्याऐवजी छोट्या गोष्टी करा. एखाद्याच्या मताला पाठिंबा द्या, छोटा प्रश्न विचारा किंवा एक-दोन वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा.
तज्ज्ञ सांगतात की, घरी आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो. तसेच, लोकांसमोर बोलताना तुमचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून बोलल्यास भीती कमी होते. (Mental Health)
लक्षात ठेवा, सोशल फोबिया हा कमकुवतपणाचा नाही, तर मानसिक आरोग्याशी संबंधित एक मुद्दा आहे. योग्य सराव, सकारात्मक विचार आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेतल्यास या समस्येवर नक्कीच मात करता येते.





