Jamkhed News : आश्वासनं फक्त नावापुरतीचा का? दुभाजक नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ, कामाला सुरूवात झाली पण….

Jamkhed News : सौताडा महामार्गाचे काम सुरू असून यामधील नगर रोड ते खर्डा चौकाचा नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. रस्ताचे काम पूर्ण झाले असून, दुभाजक नसल्यामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले होते.
अनेक दिवसांपासून नगर रोड फाटा ते खर्डा चौक रस्त्यावर दुभाजक टाकण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराकडून दुभाजक टाकण्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी काही दुकानदार आपल्या स्वार्थासाठी दुभाजकाला विरोध करत आहेत, तर दुभाजकाच्या कामात काही गाव पुढाऱ्यांचा हस्तक्षेप सुरू झाला आहे.
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जवळपास तीन वर्षे
जामखेड-सौताडा महामार्गाचे काम शहरातील खर्डा चौक ते बीड रोड काम रखडले असून दोन वर्षांत ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. खर्डा चौक ते कर्जत फाटा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तर समर्थ हाॅस्पिटल ते बीड रोड रस्त्याचे देखील काम पूर्ण झाले आहे. सौताडा घाटात काम सुरू असून भुमीअभिलेख विभागाच्या चुकीच्या नकाशामुळे सातत्याने रस्ताच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यातही लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जवळपास तीन वर्षे होत आली तरीही काम पूर्ण झाले नाही.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दुर्लक्ष
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही रस्त्याच्या कामाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या लोकप्रतिनिधींनी दोन वर्षात रस्त्याबाबत नागरिक, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची एकही बैठकी घेतली नाही. बैठकी घेतल्या असत्या तर नक्कीच काहीतरी मार्ग निघुन रस्त्याचे काम मार्गी लागले असते. मात्र या लोकप्रतिनिधीना नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या कामाकडे दुर्लक्ष केले नाही ना अशा चर्चा सुरू आहेत.
खर्डा चौक ते नगर रोड रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यास सुरुवात झाली असून काही दुकानदार व पुढारी यांनी विरोध सुरू केला आहे. तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले दुकानदाराना आपल्या दुकानाकडे येण्यासाठी रस्ता पाहिजे, मात्र दुभाजक असल्याने मोजक्या ठिकाणी वाहणे युटर्न करण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे.
खोडा घालण्याचे काम सुरू
शहरातील रस्त्यांवर दुभाजकांची गरज आहे. दुभाजक नसल्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना प्राण गमवावे लागले, तर काहींना अपंगत्व आले आहे. वाहतूकीची शिस्त नसल्याने दुभाजक हाच एकमेव पर्याय आहे, त्यातही खोडा घालण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे दुभाजक टाकताना भेदभाव न करता नियमानुसार काम करावे ही मागणी होत आहे.





