Medical Shops : रात्रीच्या मेडिकलमध्ये औषधांपेक्षा इतर वस्तूंची विक्री?
Medical Shops : मेडिकलच्या मूळ उद्देशावर प्रश्नचिन्ह, तपासणीची गरज

पिंपरी – शहरातील बहुतांश दुकाने रात्री लवकर बंद होत असताना काही मेडिकल मात्र उशिरापर्यंत सुरू असतात. रात्रीच्या वेळी औषधांची गरज असलेल्या रुग्णांसाठी ही दुकाने महत्त्वाची ठरतात. मात्र, काही मेडिकलमध्ये औषधांपेक्षा शीतपेये, चॉकलेट, मद्य सेवनासोबत खाल्ल्या जाणाऱ्या वस्तू आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे मेडिकलच्या मूळ उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्रीच्या वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास किंवा तातडीने औषधांची गरज भासल्यास नागरिक मेडिकलचा आधार घेतात. त्यामुळे अशा दुकानांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे.
औषधविक्रीसाठी असलेल्या दुकानांमध्ये इतर वस्तूंची विक्री होत असल्यास, त्याचे प्रमाण आणि संबंधित नियमांचे पालन याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे. विशेषतः तरुणांची रात्रीच्या वेळी अशा दुकानांमध्ये होणारी वर्दळ, विक्री होणाऱ्या वस्तूंचे स्वरूप आणि औषधांची उपलब्धता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मेडिकलमध्ये औषधांसोबत इतर वस्तूंची विक्री केली जाते म्हणून प्रत्येक वेळी नियमभंग झाला असे म्हणता येत नाही. मात्र, औषधविक्रीचा परवाना असलेल्या दुकानांमध्ये लागू नियमांचे पालन होत आहे का? औषधांची योग्य साठवणूक केली जाते का? आवश्यक औषधे उपलब्ध आहेत का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
मेडिकल दुकानांमधील इतर वस्तूंच्या विक्रीसोबतच औषधांच्या सुट्या गोळ्यांच्या दरांचाही मुद्दा ऐरणीवर येत आहे. एखाद्या औषधाच्या पट्टीत २० गोळ्या असून संपूर्ण पट्टीची किंमत ४५ ते ६१ रुपये असेल, तर एका गोळीची किंमत साधारण दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान येते.
मात्र, काही ठिकाणी याच गोळीची सुटी विक्री पाच रुपयांना केली जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे औषधांच्या पट्टीवरील किमतीच्या तुलनेत सुट्या गोळ्यांसाठी अधिक पैसे आकारले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारवाई करण्याची मागणी
रात्रीच्या वेळी मेडिकल सुरू ठेवण्यामागील प्रमुख उद्देश नागरिकांना गरजेच्या वेळी औषधे उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, औषधविक्रीला दुय्यम स्थान मिळत असल्याची परिस्थिती प्रत्यक्षात आढळल्यास, संबंधित दुकानांच्या कामकाजाची तपासणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मेडिकलच्या कामकाजाकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





