पंजाबमध्ये ‘आप’साठी वाजू लागलीय धोक्याची घंटा ? 32 आमदार संपर्कात असल्याचा कॉंग्रेस नेत्याचा पुनरूच्चार

चंदिगढ – दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाच्या पंजाब शाखेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी सोमवारी काही सनसनाटी दाव्यांचा पुनरूच्चार केला. त्यामुळे पंजाबमध्ये सत्तेवर असणाऱ्या आपसाठी धोक्याची घंटा वाजू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
आपचे अनेक आमदार पक्ष बदलण्यास तयार आहेत. माझ्या संपर्कात आपचे ३२ आमदार असल्याचे मी पुन्हा सांगतो. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. आपचे आमदार म्हणून अखेरचा कार्यकाळ ठरणार असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे पुढील निवडणूक लढवण्यासाठी ते इतर पक्षांचा पर्याय शोधत आहेत. अर्थात, आपचे सरकार पाडण्याचा कॉंग्रेसचा कुठलाही इरादा नाही. त्यामुळे संपर्कात असलेल्या आप आमदारांविषयी सबुरीने, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. निवडणूक जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाईल, असे बाजवा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या बाजवा यांनी पुढे बोलताना आणखी एक दावा केला. स्वत: मुख्यमंत्री भगवंत मान भाजपच्या संपर्कात आहेत. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मान यांना हटवण्याचा निर्णय घेतल्यास ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे त्यांनी म्हटले. माझ्या ४५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीच अयोग्य वक्तव्य केले नाही, असे म्हणत त्यांनी संबंधित दावे खरे असल्याचा दर्शवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी बाजवा यांच्यावर पलटवार केला. बाजवा यांचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे. त्यांनी बंगळुरूमध्ये भाजपच्या कोणत्या नेत्यांची भेट घेतली याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे विचारणा करावी, अशी प्रतिक्रिया अरोरा यांनी दिली.





