Archery World Cup 2023 : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रथमेश जावकरला रजतपदक

मेक्सिको सीटी :- महाराष्ट्राचा स्टार तिरंदाज प्रथमेश जावकर याने येथे सुरू असलेल्या जागतिक कंपाउंड तिरंदाजी स्पर्धेत रजतपदक पटकावले. अगदी थोडक्यासाठी त्याचे सुवर्णपदक हुकले आहे.
पुरुष गटात कंपाऊंड प्रकारात डेन्मार्कचा मथियास फुलर्टन व प्रथमेश यांच्यात सुवर्णपदकासाठी सामना झाला. तब्बल पाच सेटपर्यंत लढत बरोबरीत होती. मात्र, मोक्याच्या क्षणी प्रथमेशकडून चुक झाली व मथियासने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
प्रथमेश याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीच्या मिग्वेल बेसेरा याच्यावर 149-141 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नेदरलॅंडच्या माईक श्लोसर याला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
अंतिम लढतीत एकवेळ प्रथमेश व मथियास यांच्यात 148-148 अशी बरोबरी झाली होती. अखेरच्या 10 व्या फेरीत प्रथमेशचा निशाणा चुकला व त्याला सुवर्णपदक मिळवण्यात अपयश आले.





