Archana Patil : काशेवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीसह ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत उपस्थित केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी काशेवाडी (प्रभाग क्र. २२) परिसरातील अवैध धंदे आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत बोलताना पाटील यांनी सांगितले की, काशेवाडी परिसरात पानपट्ट्या आणि टपऱ्यांवरून उघडपणे ‘एमडी’ सारख्या अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या व्यसनाच्या आहारी अल्पवयीन मुले जात असून ड्रग्ज खरेदीसाठी चोऱ्यांसारख्या गुन्ह्यांकडे त्यांचा कल वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या व बेवारस वाहनांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्याव्यवसायाचे रॅकेट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चौकीतून परत पाठवून थेट खडक पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध धंद्यांची ठिकाणे वारंवार लेखी स्वरूपात दिली असूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे नगरसेविका पाटील यांनी सांगितले. हेही वाचा : Share Market Today: शेअर बाजारात मोठा गोंधळ! सेन्सेक्स ८७३ अंकांची तर निफ्टीत २५४ अंकांची घसरण