Pune Crime : ARAI टेकडीवरील 17 वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
Pune Crime : पुण्यातील एआरएआय टेकडीवर १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा कोथरूड पोलिसांनी दोन तासांत छडा लावला. मयताच्या दोन मित्रांना ताब्यात घेत हत्यार जप्त केले.

Pune Crime : कोथरूड येथील ए.आर.ए.आय. टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या दोन तासांत छडा लावला.
मयताच्या दोन मित्रांनीच हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही संशयित विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेले हत्यारही हस्तगत करण्यात आले आहे.
दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ए.आर.ए.आय. टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोथरूड पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. तपास पथकातील पोलीस हवालदार दत्ता सोनावणे यांनी केलेल्या चौकशीत मृत तरुणाचे नाव निल विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले.
मृताची ओळख पटताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांनी पथकातील कर्मचाऱ्यांच्या पाच वेगवेगळ्या टीम तयार केल्या. गुप्त बातमीदार तसेच इतर माध्यमातून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलीस हवालदार दत्ता सोनावणे, श्रीकांत दगडे आणि राजेंद्र लांडगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हा खून मयताच्या दोन मित्रांनी केल्याचे समोर आले. त्यापैकी एक संशयित त्याच्या राहत्या घरी लपून बसला होता, तर दुसरा मार्केटयार्ड परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोघांनाही वेळेत ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग सौ. सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे, तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस हवालदार दत्तात्रय सोनावणे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत दगडे, शकील पठाण, तसेच पोलीस शिपाई शिवप्रसाद दहिफळे, मयुर पांढरे, वैभव शितकाल, गणेश डोंगरे, ऋषीकेश कोळप आणि आकाश वाल्मिकी यांनी सहभाग घेतला.





