पुणे जिल्हा | टँकर प्रस्तावांना 12 तासांत मान्यता द्या

इंदापूर, (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासांत मंजुरी द्यावी, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी बारामतीचे प्रांत अधिकारी, इंदापूरचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
इंदापूर येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी विविध विषयांवरती संवाद नुकताच साधला. ते म्हणाले की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. रविवारी (दि. 2) सकाळीच मी त्यांची व कुटुंबीयांची भेट घेतली.
तुम्ही तहसील कार्यालयात जावून नेहमीप्रमाणे कामकाज चालू ठेवा व कर्मचार्यांना बेमुदत संपापासून परावृत्त करून तालुक्यातील जनतेला अडचणी येऊ देऊ नका, अशी माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यानुसार ते आता तहसील कार्यालयात गेले आहेत.
इंदापूर तालुक्याची संस्कृती चांगली आहे. 1952 पासून शंकररावजी भाऊ पासून व नंतर 20 वर्षे आम्ही सत्तेवर असताना असे कधीही घडलेले नाही, यास जबाबदार असणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.
देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन मी व कुटुंबियांनी घेतले त्यामुळे मध्यंतरी आम्ही तालुक्यामध्ये नव्हतो. यादरम्यान कळाशी येथे घडलेली बोट दुर्घटना ही दुर्दैवी आहे, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.
करमाळा तालुक्यातील धनंजय डोंगरे यांच्या कुटुंबासह इतरांची भेट मी घेणार आहे. बोट प्रवासादरम्यान प्रवाशांनी जॅकेट व इतर सुरक्षा साधने वापरणे आवश्यक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनीकेले.
दुष्काळी पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा हवा
मध्यंतरी वादळामुळे इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पिके, फळबागा यांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले आहेत. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये तसेच राज्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
उजनीतील पाण्याचे उच्चस्तरीय नियोजन गरजेचे
उजनी धरणामध्ये डिसेंबर महिन्यात 72 टक्के एवढा मोठा पाणीसाठा होता.उजनीतील पाणीसाठा वापराचे जर योग्य नियोजन झाले असते तर आज चांगली परिस्थिती दिसली असती.
मात्र सध्या उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर उजनीतील जलसाठ्याचे उच्चस्तरावरती नियोजन होणे गरजेचे असल्याची चर्चा करणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.





