पुणे | बदलापुरच्या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आदर्श विद्या प्रसारक संस्था, कुळगाव बदलापूर संचलित आदर्श विद्यामंदीर (मराठी माध्यम) या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभुमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता शाळेवर कारवाई होणारच आहे.
सफाई कामगाराने अत्याचार केल्याचे निदर्शनास आले असून ही बाब उशीराने उघडकीस आल्याने शाळेने या प्रकरणी जाणीवपूर्वक विलंब केला असल्याचे आढळून आले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य व जनमाणसात उसळलेला तीव्र प्रक्षोभ लक्षात घेता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन संबंधित शाळेचे पदाधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांची अॉनलाइन बैठक घेण्यात आली. यातून शाळेच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
या प्रकरणी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शाळेवर तरतुदीनुसार प्रशासक नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शिफारशीसह प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पाठविला होता. त्यास मान्यताही देण्यात आली.
त्यानुसार ठाणे जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडीत यांची शाळेवर प्रशासक म्हणुन नियुक्ती केली आहे.
विस्तार अधिकारी राजकुमार जतकर, के. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यास अवर सचिव आ.रा. राजपुत यांनी मान्यता दिली आहे.
शाळा व्यवस्थापनाकडून प्रकरण गंभीरतेने न हाताळल्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
या प्रकरणात असंवेदशीलता व कर्तव्यात दाखवेला अक्षम्य हलगर्जीपणा यामुळे आरटीई कायदा आणि शासनाच्या प्रचलित धोरणाचा भंग शाळा व्यवस्थापनाकडून झाल्याचे निदर्शनास येते.
शाळेचे व्यवस्थापन प्रशासकाच्या ताब्यात आल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी काढले आहेत.
बदलापुरच्या शाळेच्या कामकाजात आढळलेल्या त्रुटी
– पालकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून असंवेदशीलता दाखवली
– शाळेकडून गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ
– सखी सावित्री समिती गठीत केलीच नव्हती
– सीसीटीव्ही बंदच आढळले
– महिला कर्मचाऱ्यांची नियुक्तीच नाही





