Saswad News | वीर येथील हल्लेखोरांवर मकोका लावा

प्रभात वृत्तसेवा
सासवड – पुरंदर तालुक्यातील वीर येथे गुरुवारी (दि. 24) रात्री 9 वाजता सौरभ सुरेश वाघ या युवकावर दिलीप धुमाळ व अमोल अप्पासाहेब धुमाळ व त्यांच्या 20-25 साथीदारांनी मिळून अमानुष मारहाण केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना ओबीसी संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले.
पोलिसांनी केवळ 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराने केलेल्या फिर्यादीत पोलिसांनी सौम्य कलमे लावल्याने आरोपींना लगेच जामिनावर सुटण्यास मदत झाली, असा दावा केला आहे. घटनेनंतर आरोपींनी गावात फटाके फोडून जातीवाचक शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी यांनी धमक्याही दिल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे फिर्यादी वाघ व त्याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर अद्याप ताब्यात घेण्यात याव्यात मुख्य आरोपी अमोल धुमाळ हा सराईत गुन्हेगार असून पत्रकारांवरील हल्ले, दमदाटी यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये तो यापूर्वीही सहभागी असल्याचे समोर आले आहे. तो स्वतःची टोळी चालवतो, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे वीर परिसरात प्रचंड संतप्त वातावरणआहे.
पोलिसांनी निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यावेळी अॅड. मंगेश ससाने, अॅड. मृणाल ढोले पाटील, पांडुरंग मेरगळ, समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल, विजय गिरमे, हर्षल बारवकर, अमोल नवले, अनिकेत भागवत, अक्षय शिंदे, तुषार वचकल, नितीन राऊत, प्रवीण होले, अक्षय शिंदे, वैभव वचकल उपस्थित होते.





