पुणे जिल्हा | मका पिकावर लष्करी अळीचा घाला

मोरगाव, (वार्ताहर)- बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील खरीप हंगामाचे पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. उपलब्ध असलेल्या पाण्यावर मोरगावसह परीसरातील शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. मात्र, लष्करी अळीचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी धास्तावला आहे. पिकावर तीन फवारणी करुनही अळीचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, जळगाव कप, बाबुर्डी, माळवाडी, मासाळवाडी, पळशी, मासाळवाडी हा परिसर दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. शेतीकरी दुग्ध व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून पाहतात. खरीप हंगामात मका पीक या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
सध्या मका पिकावर तीन-तीन फवारणी करूनही लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे. यावर्षी सातत्याने असलेले ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार रासायनिक औषधांच्या फवारणी करावी लागत आहे. असणारे उत्पन्न मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कृषी खात्याने मार्गदर्शन करण्याचे मागणी होत आहे.





