पिंपरी | चिंचवडमध्ये तब्बल १९ इच्छुकांचे अर्ज दाखल

पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर तसेच मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यासह तब्बल १९ इच्छुकांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी भरण्याचा आज मंगळवारी (दि. २९) शेवटची मुदत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर भाऊसाहेब भोईर यांनी वडील कै. सोपानराव भोईर यांच्या भोईर नगर येथील पुतळ्यास, क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मंगलमूर्ती वाड्यात श्री मोरया गोसावी यांचे दर्शन घेतले.
काळभैरवनाथ मंदिर व धनेश्वर मंदिर तसेच शहरातील महापुरुषांना अभिवादन करत रॅली काढत दळवी नगर, चिंचवड गाव अशा नियोजित मार्गाने ग क्षेत्रीय कार्यालय येथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कन्या मानसी गौरव घुले-भोईर, माजी नगरसेवक गणेश लोंढे, हनमंत माळी, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार अरुण पवार यांनी संभाजी ब्रिगेड (१) यांचा पाठिंबा घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून मारूती भापकर, राष्ट्रीय समाज पक्षाकडून भरत महानवर, वंचित बहुजन आघाडीकडून जितेंद्र वाडघरे, बहुजन समाज पार्टीकडून राजेंद्र गायकवाड यांच्यासह तब्बल १९ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज आज दाखल केले.





