Pune | शिष्यवृत्तीसाठी अर्ज; उद्यापर्यंतच मुदत

पुणे : सर्व अशासकीय अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, सर्व अकृषि विद्यापीठे, सर्व संस्थांना विशेष मोहिमेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महाडीबीटी पोर्टलवरून १४ शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंतच मुदत दिली आहे. २५ नोव्हेंबर ते दिनांक ६ डिसेंबरदरम्यान विशेष सप्ताह राबवून विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्याबाबत पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने ऑनलाइन मीटिंग, सूचना, परिपत्रक, दूरध्वनीद्वारे कळविले आहे. मात्र, उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचे प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी ऑनलाइन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहेत.
महाविद्यालयांच्या स्तरावर ६ हजार ७६२ अर्ज अद्यापही पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या स्तरावर महाविद्यालयांकडून २ हजार ७० अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची पडताळणी सुरू असून, ते कामकाज तीन दिवसांत पूर्ण केले जाईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर संगणक सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून प्रोत्साहित करावे, तसेच सर्व महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठांनी महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहिमेअंतर्गत राबविलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी केल्या आहेत.





