रूपगंध : स्पर्श

मालदीव बेटांवर सहलीसाठी काही लोक एकत्र आले होते. जगातील वेगवेगळ्या देशातील, धर्मातील, लिंगातील सुमारे 125 जण संध्याकाळी एकत्र बसले. एक खेळ सुरू करण्यात आला; यात भाग घेणाऱ्या 7/8 जणांचे डोळे बांधण्यात आले आणि त्यांना 7/8 स्त्री-पुरुषांच्या समोर उभं केलं गेलं. डोळे बांधलेल्यांनी समोरची लोकं हातानं चाचपून बघायची आणि त्यांचा वयाचा अंदाज सांगायचा. त्यात खूप गमती जमती घडल्या. म्हाताऱ्यांना तरुण तर तरुणांना म्हातारं ठरवण्यात आलं, पण एक निष्कर्ष धक्कादायक होता तो म्हणजे भारतीय उपखंडातील लोकांचं लक्षणीय अपयश. कारण उघड होतं भारतीय लोकं स्पर्शानं कमीच बोलतात.
माझ्या एका नात्यातलं चार महिन्याचं बाळ आमच्याकडं आलं होतं आणि ते आईचा डोळा चुकवून आपल्या पायाचा/हाताचा अंगठा चोखत होतं. आईच्या हे लक्षात येताच तीन घाईघाईनं त्याचे अवयव आणि ओठ अलग केले. यातून झालं काय तर त्या बाळाला स्वतःच्या अवयवांची पर्यायानं स्वतःची ओळख करून घ्यायची संधी नाकारली गेली आणि त्याचा स्व-विकास खोळंबून ठेवण्यात आला. त्यापेक्षाही क्रौर्य पुढे गाठलं गेलं ते म्हणजे त्याच्या हातापायात बिन बोटाचे मोजे घातले गेले आणि आई गप्पाष्टक झोडायला मोकळी झाली.
माझ्या एका मित्राच्या मुलाचे परदेशात अपघाती निधन झाले. त्याचे शव इतके खराब झाले होते की बॉडी शवपेटीतून आणली तेव्हा ती न उघडताच स्मशानात नेली गेली. त्यावेळी माझ्या मित्रानं शवपेटीवरून हात फिरवून केलेला स्पर्श आठवला तरी कालवाकालव होते.
एक जुना वाडा पुनर्विकासासाठी सज्ज झाला.
ती वास्तू सोडताना त्या घरातील आजोबांनी साश्रू नयनांनी भिंतीभिंतीना केलेला स्पर्श मी बघितला तेव्हा मनात आलं की हे आजोबा दोन वर्षानं नव्या घरात येतील तेव्हा इतका आसुसून नव्या भिंतीला कवटाळतील का? नागझिऱ्याच्या जंगलात प्राणीमित्र रघुनंदन कुलकर्णीच्या सोबत एका पाणवठ्यावर रात्रभर वाघ बघण्यासाठी बसून राहिलो होतो. आपली चाहूल प्राण्यांना लागू नये म्हणून नि:शब्द बसणं अपरिहार्य होतं. वाघ बघायला नाही मिळाला पण त्या गूढ अंधारात मी माझेच अवयव चाचपून बघत होतो तेव्हा जाणवलं की आपण वर्षानुवर्षे आंघोळही किती “कोरडेपणानं’ केली.
एखाद्या घरात एका पुरुषाचा मृत्यू होतो तेव्हा अंत्यदर्शनासाठी त्याच्या बायकोला आणलं जातं. त्यावेळी तिची शेवटचा स्पर्श करायची भावनिक गरज पूर्ण होते का? अनावश्यक कोंडाळ्यात जनलज्जेमुळे ती यापासून वंचित राहते. साठी-सत्तरीच्या व्यक्तीला तिच्या जोडीदार व्यतिरिक्त किती स्पर्श अनुभवायला मिळतात. किंवा किती भावांना लग्न झालेल्या बहिणीचे तसेच किती बहिणींना लग्न झालेल्या भावाचे स्पर्श अनुभवायला मिळतात? लग्न कार्यात भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंनाही आपण समारंभानंतर किती वेळानं हात लावतो.
बसमध्ये एक आफ्रिकी काळा बसला होता. त्याच्या डोईवरील राठ केस पाहून खराट्याची आठवण येत होती. माझ्या बायकोनं धीटपणे त्याला विचारलं की मी तुझ्या केसांना हात लावून पाहू का? त्यानं हसत हो म्हटलं आणि… ते केस कमालीचे मऊ होते आणि त्यामुळे या लोकांबद्दलचे समजही मुलायम झाले. सरतेशेवटी एक… आपल्या राष्ट्रध्वजाला कधी हात लावून पाहिलंय का?
– दीपक पारखी





