रूपगंध : गालबोट

जागतिक क्रीडा क्षेत्रात गेल्या आठवड्यात अनेक अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे प्रचंड वाद घडले. अशा घटना क्रिकेटच नव्हे एकूणच क्रीडाक्षेत्राला गालबोट लावणाऱ्या ठरल्या. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनीचे आश्लाघ्य वर्तन, चीनची टेनिसपटू पेंग शुईचे आरोप असो किंवा भारताची टेबल टेनिसपटू मनिका बात्राची महासंघांशी सुरू असलेली कायदेशीर लढाई असो यांमुळे सर्वसामान्य क्रीडा रसिकांना प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा या गोष्टींनीच निराश केले असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
सर्व क्रिकेटक्षेत्राला काळिमा फासला जावा अशी घटना ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनीकडून घडली. चार वर्षांपूर्वी एका महिला सहकाऱ्याशी पेनीने केलेला अश्लिल संवाद चांगलाच वादग्रस्त ठरला. अर्थात हे सगळे घडले ते टळू शकले असते मात्र, त्यातही काही खेळाडूंना कदाचित पेनीच्या नेतृत्वाखाली खेळायचे नसावे त्यामुळेच या प्रकरणाला इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा हवा देण्यात आली.
ऑस्ट्रेलियाचा संघ आता इंग्लंडविरुद्धच्या पारंपरिक ऍशेस कसोटी मालिकेसाठी सज्ज होत असतानाच हे घडले. पेनीने नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्णधारपद सोडले मात्र, त्यामुळेही समाधान झाले नाही, त्याची बदनामी व्हायची तेवढी झालीच. चार वर्षांपूर्वी एका महिला सहकाऱ्याशी केलेल्या अश्लिल भाषेतील (सेक्सटींग स्कॅंडल) संवादाचे प्रकरण पेनीला भोवले. या संपूर्ण प्रकरणावर माफी मागत पेनीने अशेस कसोटी मालिकेपूर्वीच संघाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
खरेतर यात नवे काहीच नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या काही क्रिकेटपटूंचे प्रताप यापूर्वीही चांगलेच गाजले आहेत. अँड्य्रू सायमंड्स, शेन वॉर्न यांनी देखील मैदानाबाहेर अशा अनेक गोष्टी केल्या आहेत की ज्याचे समर्थन करताच येणार नाही. पेनी हा त्या यादीतील नवा भिडू होता इतकेच. 2018 साली मार्चमध्ये पेनीला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी घडलेल्या या प्रकरणाचा तपास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आत्ताच कसा काय सुरू केला याचेही आश्चर्य वाटत आहे.
मला या प्रकरणाचा पश्चाताप तेव्हाही होता आणि आताही होत आहे. हे दडपण मनावर घेत मी संघाचे नेतृत्व करू शकत नाही, असे पेनीने म्हटले असले तरीही “बुंद से गयी तो हौदसे नही आती’, म्हणतात तसेच हे घडत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून माझ्याकडून हे घडायला नको होते. या प्रकरणामुळे खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असेल तर मी माफी मागत आहे, असे सांगणाऱ्या पेनीचे हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, यात शंका नाही. कारण जर या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरूच झाली नसती तर त्याला ही उपरती झालीच नसती हे देखील उघड आहे.
मनिकाची खदखद
भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिने भारतीय टेबल टेनिस महासंघाशीच पंगा घेतला आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. तिला सातत्याने लक्ष्य केल्यामुळे अखेर तिने महासंघाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. जपानमधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत फारसे यश हाती लागले नसले तरीही ती आजच्या घडीला देशाची सर्वात अव्वल खेळाडू आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र, त्यावेळी तिची या ऑलिम्पिकसाठी निवड होण्यापूर्वी तिला निवड चाचणीत पराभूत होण्यास सांगितले गेल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आणि तिच व्हिलन ठरली.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातील उपस्थितीबाबतच्या नियमांबाबत एक याचिकाही मनिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याआधी तिने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर सामना निश्चितीसाठी दडपण टाकल्याचाही आरोप केला होता. तिच्या आरोपांनंतरच तिला सातत्याने डावलले जात असल्याचेही समोर आले व तिचा लढा सुरू झाला. यात किती तथ्य आहे ते लवकरच कळेलच मात्र, तिने केलेल्या आरोपांवर ठाम उत्तर रॉय यांनी अद्याप दिलेले नसल्याने याबाबतची शंका कायम आहे.
तिने दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाने टेबल टेनिस संघटनेवर ताशेरे ओढले आहेत. क्रीडापटूंना लक्ष्य केले जाऊ नये आणि लक्ष्य केले गेले असेल, तर ती गंभीर समस्या आहे, असे ताशेरेही न्यायमूर्तींनी ओढले आहेत. इथेच पाणी मुरताना दिसत आहे. जी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करते तिलाच लक्ष्य करण्याचा हा कट नक्की कोणाचा आहे ते देखील समोर आले पाहिजे म्हणजे समाजात सज्जन म्हणून वावरत असलेल्यांचा खरा चेहरा समोर येईल.
भारतीय संघटनेप्रमाणेच आता आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही मनिकाला एखाद्या सराईत आरोपीप्रमाणे वागूणक दिली जात आहे. भारतीय संघटनेनेच त्यांना माझ्या कृतीबाबत कळवले असावे. आता मला स्पर्धेच्या सरावाकडे लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे, असे सांगताना मनिकाने आपल्याला या प्रकरणामुळे किती मनस्ताप सहन करावा लागत आहे हेच दाखवून दिले आहे.
संघटनेने खेळाडूंना लक्ष्य करू नये, असेही न्यायालयाला सांगावे लागते इथेच एक संघटना म्हणून अपयशी ठरत नाही का? भारतीय क्रीडाक्षेत्र पारदर्शक व्हावे यासाठी निश्चित असे कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आजच्या काळाबाबत बोलायचे झाले तर तब्बल 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात त्यातही क्रीडाक्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूला अशा घटनांमधून जावे लागले तर त्याची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू बेंचवर असतात.
इतकेच नव्हे तर मनिकाने ज्यांच्यावर आरोप केले ते सौम्यदीप रॉय देखील एक माजी खेळाडू व प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मर्जीतील खेळाडूला संधी मिळावी यासाठी तयार करण्यात आलेले हे चक्रव्यूह असेल हे देखील नाकारता येणार नाही. मनिकाच्या आरोपांवर सौम्यदीप रॉय यांचे मौनही आश्चर्यकारक असल्याचे दिसून येते.
या एकूणच प्रकरणात न्यायालयाने दिलेले निर्देश पाहिले तर टेबल टेनिस संघटनेच्या भूमिकेबाबत शंका निर्माण व्हावी अशीच परिस्थिती आहे. यातून येत्या काळात संघटना बोध घेईल व प्रामाणिक खेळाडूंवर अन्याय होणार नाही याची काळजी घेईल हीच अपेक्षा आहे. चूक कोणाची आहे ते समोर आले तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी हीच क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे.
पेंग शुई प्रकरणाचे काय होणार?
चीनमध्ये सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो यात नवे नाही; पण एक खेळाडू जागतिक स्तरावर देशाला यश मिळवून देतो त्याच्यावरच बेपत्ता होण्याची वेळ यावी या पेक्षा मोठी शोकांतिका असूच शकत नाही. चीनची आघाडीची महिला टेनिसपटू पेंग शुई हिने अनेक वर्षे मनात साठलेली व्यथा बोलून दाखवताना कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उप-उच्चाधिकारी झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आणि एक मोठे वादळ निर्माण झाले.
इतक्या मोठ्या व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यामुळे तिच्या जीवाला धोका उत्पन्न होणारच. तसेच घडले व पेंग शुई अचानक बेपत्ता झाली. त्यावरून चीनला हे प्रकरण शांत होईल असे वाटले मात्र, तो गैरसमज ठरला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले व पेंगचा ठावठिकाणा लागत नाही व या प्रकरणातील तथ्य स्पष्ट होत नाही तोपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिसची एकही स्पर्धा आयोजित करणार नाही अशी भूमीका घेतल्याने चीनच्या पायाखालची जमीन सरकली.
एका समाजसेवी संस्थेच्या कार्यक्रमात पेंग अवतरली व तो व्हिडिओ या संस्थेने व्हायरल केला. तरीही समितीचे समाधान झाले नाही व अखेर पेंगला समोर यावे लागले व सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशी संवाद साधला व आपण सुरक्षित असल्याचे सांगितले तेव्हा समाधान झाले. मात्र, तरीही एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे पेंग बेपत्ता का झाली आणि तिला आपण सुरक्षित आहोत हे सांगायचे होते तर त्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद का घेतली नाही.
तसेच समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून समोर येण्यात तिने काय मिळवले. या प्रश्नांची उत्तरे येत्या काळत मिळतील असेही ठामपणे सांगता येत नाही. कारण हे चीनमध्ये घडले आहे. सत्य लवपून ठेवण्याची त्यांची जुनी खोड आहे. प्रकरण अंगाशी आल्यावर खुलासा करायचे त्यांचे धोरण याही बाबतीत दिसून आले.
मुख्य म्हणजे पेंग सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी आली तेव्हाच या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याची साक्ष पटली. ज्या उच्चपदस्थ व्यक्तीवर तिने आरोप केले त्याला वाचवण्यासाठी पेंगला धमकी देत किंवा साम, दाम, दंड भेद हे सर्व उपाय वापरून चीनने आपल्या माणसाला वाचवण्याची केलेली ही योजना असावी, असा संशय अद्याप घेतला जात आहे.
असो, या केवळ उदाहरणादाखल तीन घटनांचा उल्लेख केला आहे. या सगळ्यांबाबतचे तथ्य समोर आले की यावर पडदा पडेल पण तरीही त्यामुळे संपूर्ण क्रीडाक्षेत्र स्वच्छ होईल अशी अपेक्षा बाळगण्यात काहीही अर्थ नाही असेच सांगावेसे वाटते. गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्थानिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत सगळीकडेच अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे क्रीडाक्षेत्राला गालबोट लागले आहे. अशा गोष्टी टाळता आल्या किंवा त्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला तरच नियंत्रण मिळेल अन्यथा काळिमा ठरतील अशा घटना घडतच राहतील.
अमित डोंगरे





