लंडन : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंजाबमधील प्रसिद्ध जालियनवाला बागेमध्ये जनरल डायर यांनी केलेल्या बेछुट गोळीबाराबद्दल ब्रिटन सरकारने भारतीयांची माफी मागावी, असे आवाहन ब्रिटनच्या संसदेतील कन्झरवेटिव पक्षाच्या एका खासदाराने केले आहे. बॉब ब्लॅकमन असे या खासदाराचे नाव असून ते हॅरो ईस्ट येथील लोकप्रतिनिधी आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलत असताना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण काढली. अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीचा उत्सव साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेत लोक जमा झाले होते. आपल्या कुटुंबीयांसमवेत जमलेल्या नागरिकांवर ब्रिटीश अधिकारी जनरल डायर याने ब्रिटीश लष्कराच्यावतीने सशस्त्र दलांकरवी बेछुट गोळीबार केला होता. सशस्त्र दलांकडील काडतुसे संपेपर्यंत हा गोळीबार सुरू ठेवला गेला होता. या क्रूर हत्याकांडात तब्बल १,५०० लोक ठार आणि १,२०० जखमी झाले होते. जनरल डायरने केलेल्या या हत्याकांडामुळे तत्कालिन ब्रिटीश साम्राज्यावर एक कलंक लागला, अशा शब्दात २०१९ मध्ये ब्रिटनच्या तत्कालिन पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला हत्याकांडाची दखल घेतली होती. मात्र या संदर्भात सरकार म्हणून आपण या वर्षी १३ एप्रिल रोजीच्या या हत्याकांडाच्या स्मृतिदिनी एक निवेदन प्रसिद्धीस द्यावे. भूतकाळात जे झाले, ते चूकीचे झाले. त्याबद्दल भारतीयांची औपचारिकपणे माफी मागितली जावी, असे ब्लॅकमन यांनी म्हटले आहे. ब्लॅकमन हे ६ मे २०१० पासून लोकप्रतिनिधी आहेत. वरिष्ठ खासदार म्हणून त्यांनी मांडलेल्या विचारांची दखल घेतली जावी. असे सांगून सभागृह नेत्या ल्युसी पॉवेल यांनी ब्लॅकमन यांचे आभारच मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून या मुद्याची दखल घेतली जाईल, याची हमी त्यांनी सभागृहाला दिली. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी मिळाली होती. ब्रिटीश सरकारविरोधात खदखदत असलेला भारतीयांच्या मनातील असंतोष उघडपणे व्यक्त होऊ लागला आणि स्वातंत्र्याच्या मागणीने जोर धरला. थेरेसा मे यांनी व्यक्त केला होता खेद जालियनवाला बाग हत्याकांडाला २०१९ साली १०० वर्षे पुर्ण झाली. त्यावेळी १९१९ मधील जालियनवाला बागची दुर्घटना ही ब्रिटिश भारतीय इतिहासावरील एक लज्जास्पद डाग आहे आणि जे घडले आणि त्यामुळे झालेल्या दुःखाबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते, असे तत्कालिन पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटिश संसदेत सांगितले होते. त्याच वर्षीच्या पुढच्याच महिन्यात, लंडनमधील डाउनिंग स्ट्रीट येथे झालेल्या बैसाखीच्या स्वागत समारंभात मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटन सरकारच्यावतीने पुन्हा तीव्र खेद व्यक्त केला होता.