“…अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही”; ‘छावा’ चित्रपटाच्या वादानंतर उदय सामंतांचा इशारा

Chhaava Movie | अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
छावा चित्रपटातील काही दृश्यांवरुन वाद निर्माण झाला असून मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका घेतली आहे. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी भूमिका मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवली आहेत. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, छत्रपती संभाजीराजांचा अवमान करणारे चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते आणि कलाकार यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी काही शिवप्रेमी संघटनांनी केली आहे. त्यानंतर उदय सामंत यांनी छावा चित्रपटाबद्दल सरकारची भूमिका ट्वीटद्वारे मांडली आहे.
उदय सामंत यांचे ट्वीट
मंत्री उदय सामंत यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत म्हटलं की, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा, त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. Chhaava Movie |
धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि…
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2025
महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,” असे सामंत यांनी म्हंटले आहे.
कशावरून सुरू आहे वाद ?
छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई नाचतानाचा सीन दाखवण्यात आला आहे. शंभूराजे आणि येसुबाई लेझीम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. हा इतिहासाचं अपमान केल्याचं म्हणत शिवप्रेमींनी या चित्रपटाचा निषेध करत बंदीची मागणी केली आहे. Chhaava Movie |
हेही वाचा:
अवघ्या 4,999 रुपयात मिळतोय शानदार LED TV, फीचर्स खूपच जबरदस्त; डिटेल्स पाहाच





