Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके जाणार चीनच्या दौऱ्यावर

कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके हे जानेवारी महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडून आज करण्यात आली. दिसानायके बारत भेट संपवून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी आणि पंतप्रधान हरिणी अमरसूर्या यांची मंगळवारी चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय समितीच्या उपाध्यक्षा किन बोयोंग यांनी भेट घेतली होती.
त्यावेळी चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला श्रीलंकेचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही देखील दिसानायके यांनी दिले होते. त्यानंतर अल्पावधीतच दिसानायके यांच्या चीन भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. मी जानेवारीच्या मध्यात चीनला जाणार आहे, असे दिसानायके यांनी कँडी येथे पत्रकारांना सांगितले.
दिनांक २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर दिसानायके यांचा गेल्या आठवड्यातला भारत दौरा हा त्यांचा पहिला परदेश दौरा होता. श्रीलंकेच्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया होऊ दिल्या जाणार नाहीत, अशी हमी दिसानायके यांनी भारत भेटीदरम्यान दिले होते. मात्र चीनने श्रीलंकेला सतत पाठिंबा दर्शवला आहे. आंतरराष्ट्रीय कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी चीनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिसानायके यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.





