पिंपरी | अनुप मोरे यांची भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड…

पिंपरी,(प्रतिनिधी) – आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पाश्चभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांची भाजयुमो प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील आणि प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील पक्ष प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अनुप मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवडीची घोषणा करत नियुक्तीपत्र दिले.
बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे. पंतप्रधान मोदींच्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
अनुप मोरे यांचा युवा पिढीसोबत असलेला थेट कनेक्ट पाहता त्याचा पक्षालाही फायदा व्हावा, यासाठी आगामी निवडणुकांच्या मुहूर्तावर मोरे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षनिष्ठा जपणाऱ्या चळकार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पक्षाने मोठं केल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
अनुप मोरे यांचा राजकीय प्रवास
मोरे यांनी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या सरचिटणीस, शहराध्यक्ष पदांवर केलेल्या भरीव कामाची दखल घेत त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
त्यानंतर भाजपा शहर सरचिटणीस व प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी देत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष, युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी दिली. या पदांवर राहून त्यांनी राज्यभर कार्यकत्यांची एकजूट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
”केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील पक्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात मला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळाली आहे. शंभर टक्के काम करून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला वचनबध्द होण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे. युवा वॉरियर्सच्या स्थापनेनंतर प्रदेश संयोजक पदाची मोलाची जबाबदारी मला मिळाली.
ती माझ्यासाठी सुवर्णसंधी ठरली. मला राज्यभर काम करता आले. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पक्षाशी बांधिलकी आणि युवकांच्या विकासाची जबाबदारी याची सांगड घालून नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत कार्य करत राहणार आहे.” – अनुप अविनाश मोरे, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष – भाजयुमो,





